टीव्ही पाहण्यावरुन आईचा ओरडा खावा लागल्याने घर सोडून आलेल्या अल्पवयीन तरुणीला मुंबई पोलिसांनी पुन्हा तिच्या घरी सुखरुप पाठवलं आहे. महिला कॉन्स्टेबल जिजाबाई पवार यांच्या प्रसंगावधान आणि सतर्कतेमुळेच हे शक्य झालं आहे. तरुणी पुण्याची रहिवासी आहे. आई-वडिलांसोबत तिची भेट घालून देण्यात आली असून त्यांनीदेखील कुलाबा पोलीस ठाण्याच्या महिला कॉन्स्टेबल जिजाबाई पवार यांचे आभार मानले आहे.

महिला कॉन्स्टेबल जिजाबाई पवार स्वातंत्र्यदिनाला गेट वे ऑफ इंडियावर गस्त घालत होत्या. यावेळी तिथे एक अल्पवयीन तरुणी एकटीच फिरत असल्याचं त्यांना आढळलं. त्यांनी तरुणीला नाव विचारत तिची चौकशी केली. यावेळी तिने आपलं नाव आणि वय सांगत आपण पुण्याची रहिवासी असून खूप वर्षांपूर्वी आई-वडिलांचं निधन झालं असल्याचं सांगितलं. तरुणीच्या उत्तरावर जिजाबाई पवार यांना समाधान झालं नाही.

त्यांनी तिला विश्वासात घेऊन अजून विचारपूस केली असता तिने खरी गोष्ट सांगितली. आईने टीव्ही पाहण्यावरुन ओरडल्याने मी नाराज झाले होते. याच रागात मी घर सोडले आणि देहू येथून थेट मुंबई गाठली अशी माहिती तरुणीने दिली. यानंतर तरुणीला कुलाबा पोलीस ठाण्यात आणण्यात आलं.

तरुणीकडून तिच्या आई-वडिलांना फोन नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्याकडून योग्य ते पुरावे मिळाल्यानंतरच त्यांना मुलीचा ताबा देण्यात आला. वेळीच प्रसंगावधान दाखवत मुलीला सुखरुप सोपवल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आणि खासकरुन जिजाबाई पवार यांचे आभार मानले आहेत. तरुणी अल्पवयीन असल्याने परिस्थिती गंभीर होण्याची भीती होती. जिजाबाई पवार यांनी कर्तव्य बजावत इतरांपुढे योग्य तो आदर्श ठेवला आहे.