सिडको-एमएसआरडीसी यांचा संयुक्त प्रकल्प ; ७७५ कोटींच्या कामास जानेवारीत सुरुवात

शीव-पनवेल महामार्गावर वाशी खाडी पुलाजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय ठरणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचे काम येत्या जानेवारीपासून सुरू करण्याच्या हालचाली राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सुरू केल्या आहेत. या प्रकल्पासाठी सिडको आणि एमएसआरडीसी यांच्यात हातमिळवणी झाल्यानुसार ७७५ कोटींच्या निधीसाठी सिडको मोठय़ा प्रमाणावर कर्ज देणार आहे.

शीव-पनवेल मार्ग हा मुंबई-नवी मुंबईतील नागरी व औद्योगिक भागांतून जात असून, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रचंड वर्दळीचा मार्ग समजला जातो. या मार्गावर वाशी खाडीपुलावर पहिला चौपदरी पूल बांधण्यात आला. तो कमकुवत झाल्यामुळे आणि वाहतुकीत वाढ झाल्यामुळे १९९४ मध्ये या ठिकाणी दुसरा खाडीपूल बांधण्यात आला. आता या मार्गावरील पुढील २० वर्षांतील वाहतूक वर्दळ लक्षात घेऊन तिसरा खाडी पूल बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याची जबाबदारी एमएसआरडीसीवर सोपविण्यात आली आहे. सुमारे ७७५ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी महामंडळाने स्वत: निधी उभारावा आणि वाशी टोल नाक्यावर सप्टेंबर २०३६ पर्यंत टोल वसुलीतून हा खर्च भागवावा अशी भूमिका राज्य सरकारने घेतल्यानंतर सुरुवातीस या प्रकल्पासाठी निधी देण्यास कोणी तयार नव्हते. आता मात्र सिडकोने या प्रकल्पासाठी कर्ज देण्याची तयारी दाखविली असून, त्याबाबत दोन्ही महामंडळांत लवकरच सामंजस्य करार होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिली. त्यानुसार जानेवारीमध्ये या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होईल असेही सूत्रांनी सांगितले.

कल्याण-भिवंडीतील वाहनधारकांना दिलासा

सदैव वाहतूक कोंडीच्या समस्येने हैराण झालेल्या भिवंडी- कल्याण परिसरातील वाहनधारकांनाही लवकरच दिलासा मिळणार आहे. भिवंडी- कल्याण- शिळफाटादरम्यानच्या २१ किलोमीटर लांबीच्या चार पदरी रस्त्यांचे ३९० कोटी रुपये खर्चून सहा पदरीकरण करण्यात येणार आहे. त्यात देसाई खाडीवर दोन पूल, लोढा जंक्शन येथे दोन पदरी उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल आदी कामांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणून या प्रकल्पाच्या ४० टक्के म्हणजेच १५० कोटींचा प्रकल्प व्यवहार्यता तफावत निधी सरकारने मंजूर केला आहे. मात्र, उर्वरित निधी महामंडळाने उभारायचा आहे. या मार्गावर २०३६ पर्यंत टोल वसुली करून त्यातून हा निधी उभारण्यास महामंडळास सांगण्यात आले आहे.

टोल धोरण पारदर्शक

विशेष म्हणजे या दोन्ही प्रकल्पांवर टोलला लोकांचा होणारा संभाव्य विरोध लक्षात घेऊन या धोरणात पारदर्शकता आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार या दोन्ही प्रकल्पांसाठी रस्त्याची देखभाल- दुरुस्ती आणि टोल वसुली यासाठी स्वतंत्र ठेकेदार नेमावेत, भविष्यात होणारी वाहतूक वर्दळ लक्षात घेऊन सवलत कालावधीचा फेरविचार करावा, एकाच कंत्राटदारास सलग टोलवसुलीचे काम देऊ नये अशा सूचनाही सरकारने एमएसआरडीसीला केल्या आहेत.

दोन्ही प्रकल्पांतील बहुतांश सर्व अडथळे दूर झाले असून खाडी पुलासाठी कर्ज देण्यास सिडको तयार झाली आहे. त्यामुळे येत्या जानेवारीपासून दोन्ही प्रकल्पांचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.   – भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी