सासवड येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने परचुरे प्रकाशनातर्फे आचार्य अत्र्यांच्या साहित्याचे संकलन उलगडले जाणार आहे. आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांनी या विखुरलेल्या साहित्याचे संकलन केले आहे. या निमित्ताने ‘कऱ्हेच्या पाण्या’चा नवा प्रवाह समोर येणार असून या ग्रंथाचे नाव ‘कऱ्हेचे पाणी’ (चरित्र) असे असणार आहे.
‘कऱ्हेचे पाणी’ हे आचार्य अत्रे यांचे आत्मचरित्र असून परचुरे प्रकाशनतर्फे त्याचे पाच खंड प्रकाशित झाले आहेत. सासवड साहित्य संमेलनात जो ग्रंथ प्रकाशित होणार आहे, तो रूढ अर्थाने अत्रे यांचे आत्मचरित्र असणार नाही. तर आचार्य अत्रे यांनी दिलेली भाषणे, व्याख्याने, त्यांचे लेख, अग्रलेख आदींचे हे संकलन असणार आहे.
यातील बराचसा भाग हा अत्र्यांनी ‘मराठा’मध्ये लिहिलेल्या लेखांचा असणार आहे. त्यामुळे हे एका अर्थाने अत्रे यांचे चरित्र ठरणार असल्याचे परचुरे प्रकाशनचे आप्पा परचुरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
हे सर्व संकलन दोन खंडांत प्रकाशित केले जाणार असल्याचे सांगून परचुरे म्हणाले की, या ग्रंथात संयुक्त महाराष्ट्राचा लढा, त्या वेळचा इतिहास, संयुक्त महाराष्ट्र समितीचे काम, आचार्य अत्रे यांची भूमिका, शिवसेनेची स्थापना, त्या वेळची परिस्थिती, पानशेतचा पूर, अत्रे यांचा संबंध ज्या ज्या घटनांशी आला आहे, अशा विविध घटना, त्यामागचे काही किस्से, आठवणी अशी आजवर लोकांसमोर न आलेली माहिती या ग्रंथाच्या निमित्ताने पहिल्यांदाच समोर येणार आहे. एका अर्थाने हा ग्रंथ म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवज ठरणार आहे.
तसेच मराठी आणि महाराष्ट्र विषयाच्या अभ्यासकांसाठीही तो संदर्भ ग्रंथ म्हणून मोलाचा ठरणार आहे. हा ग्रंथ ३०० पृष्ठांचा असून या सहाव्या खंडानंतर आणखी एक खंड प्रकाशित करण्याचा विचार असल्याचेही परचुरे म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 23, 2013 2:35 am