03 June 2020

News Flash

समाजमाध्यमांवरील मजकुराच्या स्वामित्व हक्कावरून नवा वाद

चित्रपट समीक्षक गणेश मतकरी यांच्या लेखाची उचलेगिरी

‘द टिळक क्रॉनिकल्स’वर वाङ्मयचोरीचा आरोप; चित्रपट समीक्षक गणेश मतकरी यांच्या लेखाची उचलेगिरी

मुंबई : गेले दशकभर सिनेमाविषयक लिखाणासाठी मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय असलेल्या ब्लॉगवरील मजकुराची उचलेगिरी करून थेट व्यावसायिक संकेतस्थळावर वापरण्याचा प्रकार सध्या समाजमाध्यमांवर सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. ब्लॉगवाचक आणि समाजमाध्यमांमधून टीकेची झोड उठूनही या व्यावसायिक संकेतस्थळाने संबंधित मजकुराबाबत कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे मजकुराच्या स्वामित्व हक्काचा मुद्दा नव्याने उपस्थित झाला आहे.

साहित्यिक आणि चित्रपट समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मतकरी यांनी ‘आपला सिनेमास्कोप’ या ब्लॉगवर लिहिलेल्या चित्रपट परीक्षणातील मजकुराची चोरी ‘द टिळक क्रॉनिकल्स’ या संकेतस्थळावरील लेखात उघडपणे झाली असल्याचे दोन दिवसांपूर्वी निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर मजकूर, वाक्यांमध्ये काही शब्दांचा बदल करून झालेल्या या वाङ्मयचोरीबाबत समाजमाध्यमांवरील शेकडो ‘यूझर्स’नी संताप व्यक्त केला होता. मात्र तरीही या संकेतस्थळाने चोरलेला मजकूर न काढता आपल्या संकेतस्थळावर कायम ठेवला असल्यामुळे या संकेतस्थळाविषयी तीव्र रोष व्यक्त होत आहे.

‘आपला सिनेमास्कोप’ आणि ‘द टिळक क्रॉनिकल्स’वरील मजकुरामध्ये मोठय़ा प्रमाणावर साम्य आहे. मतकरी यांच्या लेखातील मजकुराचे अनेक परिच्छेद ‘द टिळक क्रॉनिकल्स’मधील लेखात एखाददुसऱ्या शब्दांचा बदल करून किंवा वाक्यांचा क्रम फिरवून वापरण्यात आले आहेत. ‘द टिळक क्रॉनिकल्स’ या संकेतस्थळाच्या प्रतिनिधींना वाङ्मयचोरी लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी लेख काढून टाकला नाही किंवा त्याला श्रेयही दिले नाही. वर आमच्याकडून कोणतेही वाङ्मयचौर्य झाले नसल्याची भूमिका घेतली, असे मतकरी यांनी सांगितले. तर ‘आम्ही वाङ्मयचोरीच्या तक्रारी गांभीर्याने घेतो. मात्र हा लेख चोरी नसून स्वतंत्र आहे; पण आक्षेप लक्षात घेऊन काही शब्दांना मूळ लेखाची लिंक आम्ही जोडली आहे,’ असे  उत्तर ‘दि टिळक क्रॉनिकल्स’च्या प्रतिनिधींनी दिले.

याबाबत ‘द टिळक क्रॉनिकल्स’चे सहसंस्थापक आमोघ ओक यांनी सांगितले, ‘समाजमाध्यमावरील चर्चेला आमच्या समाजमाध्यमांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या प्रतिनिधींनी उत्तर दिले आहे. त्या उत्तरात प्रत्यक्ष संपर्क साधण्याबाबत मतकरी यांना सांगण्यात आले होते. मात्र समाजमाध्यमावरील टिपणीव्यतिरिक्त त्यांनी आमच्याकडे याबाबत कोणत्याही प्रकारे अधिकृत तक्रार केलेली नाही.’ ‘आपला सिनेमास्कोप’च्या ‘ब्लॉग एडिटर’ने याबाबत मजकुराची चोरी करणाऱ्या योगेश राम विद्यासागर या लेखकास मजकूर संकेतस्थळावरून काढून टाकून जाहीर माफी मागावी, अशी सूचना मंगळवारी केली होती. मात्र त्याकडे लेखकाने आणि ‘द टिळक क्रॉनिकल्स’ने दुर्लक्ष केल्याचे मतकरी यांचे म्हणणे आहे.

समाजमाध्यमांवरून टीका होऊनही मजकूर काढून न टाकल्याबद्दल आणि मजकुराची उचलेगिरी करणाऱ्या लेखकाची पाठराखण केल्याबद्दल ‘द टिळक क्रॉनिकल्स’ला समाजमाध्यमांतील प्रतिनिधी जाब विचारत आहेत.

लिखाणाचा आदर राखा

मतकरी यांनी फेसबुकवर वाङ्मयचोरीबाबत पोस्ट टाकली होती. त्यानंतर समाजमाध्यमांवरील उचलेगिरीच्या मुद्दय़ावर चर्चा रंगली आहे. समाजमाध्यमावरील लिखाण हे सर्वासाठी खुले असते. ते शक्यतो परवानगी घेऊनच वापरावे. मात्र तसे शक्य नसल्यास ज्याचे लिखाण आहे त्याच्या नावासकट ते वापरण्यात यावे. छापील वाङ्मयाचा संदर्भ देणे, आवश्यक तेथे मानधन देणे आवश्यक असते. समाजमाध्यमांवर मानधनाचा प्रश्न अनेकदा नसतो. मात्र लेखकाचे नाव देणे आवश्यक आहे. दुसऱ्याच्या लिखाणाचा आदर राखण्याची शिस्त बाळगली तर समाजमाध्यमांवरील गढुळलेले वातावरण निवळेल, असे मतकरी यांनी सांगितले.

झाले काय?

लोकमान्य टिळक यांचे खापर पणतू कुणाल टिळक आणि त्यांचे सहकारी ‘द टिळक क्रॉनिकल्स’ हे संकेतस्थळ चालवतात. हे व्यावसायिक तत्त्वावरील संकेतस्थळ आहे. त्यावर योगेश राम विद्यासागर या लेखकाद्वारे ‘जोकर’ या इंग्रजी चित्रपटाचे परीक्षण प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, ते परीक्षण लेखक गणेश मतकरी यांच्या ‘आपला सिनेमास्कोप’ या ब्लॉगवरून चोरले असल्याचा आरोप मतकरी यांनी केला आहे. योगेश विद्यासागर या लेखकाने काही शब्दांमध्ये फेरफार करून आपल्या लेखालाच उतरविले असल्याचे मतकरी यांनी सप्रमाण दाखवून दिल्यानंतर समाजमाध्यमांवर योगेश राम विद्यासागर आणि ‘द टिळक क्रॉनिकल्स’ संकेतस्थळावर टीकेची प्रचंड झोड उठली. त्यामुळे मूळ मजकुराचे स्वामित्व हक्क अबाधित राहावे यासाठी काय करता येऊ शकेल, हा प्रश्न विचारला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 4:25 am

Web Title: a new dispute over the copyright of content on social media zws 70
Next Stories
1 आरे वृक्षतोड प्रकरण : पोलीस अत्याचाराच्या चौकशीची ‘आप’ची मागणी
2 पवईमध्ये तानसा मुख्य जलवाहिनीला तडे
3 आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीचीच
Just Now!
X