पोलीस महासंचालकांची नवी पद्धत

पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली जाते, अशी तक्रार नेहमीच केली जाते. यापुढे मात्र अशी टाळाटाळ पोलीस ठाण्याच्या पातळीवर केली गेल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताची नोंद ठेवण्याची नवी पद्धत राज्यातल्या आयुक्तालयांसह सर्व २९४ पोलीस ठाण्यात सुरु झाल्यामुळे आता गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना हेरून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या संकल्पनेतून ही पद्धत उभी राहिली आहे. राज्याच्या पोलीस प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर माथूर यांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात तब्बल तीन महिने सर्वेक्षण केले. पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारींपैकी अनेक तक्रारींमध्ये गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता असतानाही संबंधित पोलीस अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले. पोलीस ठाण्याचा गुन्हेगारी आलेख वाढू नये, असा त्यामागे वरिष्ठ अधिकाऱ्याचा प्रयत्न असला तरी बऱ्याचवेळा पोलिसांचा कामचुकारपणाही कारणीभूत असतो. गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करण्याचे प्रमाण ५० टक्के असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले. त्यानंतरच ‘व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिम’ (अभ्यागत व्यवस्थापन पद्धत) अमलात आणण्याचे ठरविण्यात आले, असे पोलीस महासंचालक माथूर यांनी सांगितले.

या पद्धतीत प्रत्येक पोलीस ठाण्यातील स्वतंत्र कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताची नोंद ठेवणे आणि तो कुठल्या कामासाठी आला होता, त्याचे समाधान झाले का आदी बाबींची नोंद संगणकात केली जाणार आहे. ही माहिती वरिष्ठांना एका क्लिकवर पाहता येणार आहे.

त्यामुळे आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही वा गुन्हा दाखल केला नाही, अशी अभ्यागताने तक्रार केल्यास त्याबाबत तात्काळ तपासणी केली जाईल आणि त्यास जबाबदार असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.

राज्यात २०१७ अखेर दोन लाख आठ हजार गुन्हे नोंदले गेले. २०१६ मध्ये हीच संख्या एक लाख ९१ हजार होती. याचा अर्थ गुन्हे नोंदविण्याच्या प्रमाणात आठ टक्के वाढ झाल्याचे दिसून येत असले तरी हे फसवे आहे. परंतु भारतीय दंड संहितेत तरतूद असतानाही गुन्हा नोंदविण्यास नकार देण्याचे प्रमाण खूप असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. त्यानंतरच अभ्यागत व्यवस्थापनाला महत्त्व देण्यात आल्याचे माथूर यांनी सांगितले.

आतापर्यंत पोलीस ठाण्यात येणाऱ्या अभ्यागताची कधीही नोंद ठेवली जात नव्हती. जिल्ह्य़ात काही अधीक्षक आपल्या पातळीवर ही पद्धत अवलंबित असले तरी त्यावर काहीही वचक नव्हता. नव्या नोंदणी पद्धतीमुळे प्रत्येक अभ्यागताला न्याय मिळेल     – सतीश माथूर, पोलीस महासंचालक