शहरात कुठेही पाणी तुंबणार नाही, या पालिकेच्या दाव्याला हिंदमाता परिसर दरवेळी पुरून उरतो. ब्रिटानिका पाणी उपसा केंद्र उभारल्यावरही हिंदमाता परिसरातील पाणी भरण्याची समस्या सुटलेली नाही. २९ ऑगस्टच्या मुसळधार पावसात हिंदमातावरून पालिकेला पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आल्याने आता पालिका या समस्येवर मार्ग काढण्यासाठी नव्याने विचार करत आहे. यासाठी पालिकेत संबंधित विभाग अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक बोलावण्यात आली आहे.

शहरात पाऊस पडला आणि हिंदमाता परिसरात पाणी साठले नाही, असे सहसा होत नाही. २९ ऑगस्ट रोजी दुपारी  पडलेल्या मुसळधार पावसानंतर मध्यरात्रीपर्यंत हिंदमाता परिसरातील पाणी ओसरले नव्हते. हिंदमाताच्या या परिसरातील पाणी तुंबण्याची समस्या सोडवण्यासाठी ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाअंतर्गत डॉकयार्डजवळ ब्रिटानिका पाणी उपसा केंद्र उभारण्याचा सल्ला देण्यात आला होता.

गेल्यावर्षी हे केंद्र कार्यरत झाले. मात्र हे केंद्र उभारल्यावरही हिंदमाताकडील पाणी जलदगतीने ओसरत नसल्याचे दिसून आले. हिंदमाता हा उपनगरे व दक्षिण मुंबई यांना जोडणारा महत्त्वाचा परिसर आहे. या भागामध्ये पाणी तुंबून रस्ते वाहतूक तसेच पश्चिम व मध्य रेल्वेची सेवाही कोलमडत असल्याचे वारंवार दिसून येते. त्यामुळे हिंदमाताच्या या पूर्वापार व गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी महापालिकेत मंगळवारी विशेष बैठक बोलावली आहे.

अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे होत असलेल्या या बैठकीला पर्जन्य जलवाहिन्या विभाग, भुयारी जलवाहिन्या बांधकाम विभाग, देखभाल विभाग तसेच संबंधित वॉर्डचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दीर्घकालीन उपायांची गरज

*  हिंदमाताच्या समस्येवर अल्पकालीन तसेच दीर्घकालीन या दोन्ही प्रकारच्या उपायांची गरज आहे. ब्रिटानिका जलउपसा केंद्र बांधण्यात आले असले तरी हिंदमातापासून ते सुमारे सात किलोमीटर लांब आहे. ’ ब्रिटानिका केंद्र व हिंदमाता यांच्यामध्ये केवळ दोन ते तीन मीटर उंचीचा फरक आहे. म्हणजे पाणी जाण्यासाठी उतारच मिळत नाही.

* हिंदमाताजवळ रस्ते व खासगी इमारतींखालून गेलेल्या भुयारी जलवाहिन्यांचा आकार वाढवण्यावरही मर्यादा येत आहेत.

हिंदमाताची समस्या तातडीने कमी करण्यासाठी तसेच ती पूर्ण दूर करण्यासाठी दीर्घकालीन उपाय पालिकेकडून राबवले जातील.

– विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त