शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : उपलब्ध खाटांची माहिती दडवून गरजू रुग्णांच्या व पालिके च्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या खासगी रुग्णालयांमधील खाटांची स्थिती जाणून घेण्यासाठी मुंबई महापालिके चे पथक रुग्णालयांना भेटी देणार आहे. खासगी रुग्णालयाकडून खाटांची योग्य माहिती दिली जात नाही. पण आता रिक्त आणि व्यापलेल्या खाटांसह दाखल असलेले रुग्ण, घरी सोडलेले रुग्ण याची माहिती घेण्यासाठी पालिकेची पथके ३६ खासगी रुग्णालयांना भेट देत आहेत.

राज्य सरकारच्या आदेशानुसार पालिकेने १०० खाटांहून अधिक क्षमता असलेल्या शहरातील ३६ रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा ताब्यात घेतल्या आहेत. यामधून जवळपास तीन हजार खाटा उपलब्ध होणार होत्या. या निर्णयाला आता १५ दिवस होत आले तरी प्रत्यक्षात उपलब्ध खाटा आणि रिक्त खाटा याची योग्य माहिती पालिकेला मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यात खासगी रुग्णालयातील क्षमतेपेक्षा कमी खाटा कार्यरत असणे, धर्मादाय रुग्णालयातील राखीव खाटांमधील ९० टक्के खाटा रिक्त असणे, या बाबी नुकत्याच आरोग्यमंत्र्यानी दिलेल्या भेटीत निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे या रुग्णालयांच्या खाटांची क्षमता, कार्यरत खाटा, करोना आणि इतर आजारांसाठी राखीव ठेवलेल्या खाटा आणि प्रत्यक्ष रुग्ण दाखल असलेल्या खाटा यांची तपशीलवार माहिती पालिकेने नियुक्त केलेल्या पथकांकडून घेतली जात आहे. याचा आढावा घेण्यासाठी २२ मेपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांची माहिती घेतली जात आहे. यात यांना दाखल कधी केले, घरी कधी सोडले यावरून खाटा रिक्त झाल्यावर किती पालिकेच्या ताब्यात दिल्या गेल्या हे स्पष्ट होऊ शकेल,’ असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.