अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाऊदचा हस्तक इक्बाल मिर्चीच्या एका सहकार्याला मुंबईतून मंगळवारी अटक केली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे इक्बाल मिर्चीसोबत झालेल्या कथित आर्थिक व्यवहारांसंबधीचे हे प्रकरण आहे. त्यामुळे ही अटक महत्वाची मानली जात असून पटेलांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हुमायू मर्चंट असे या अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. लंडन, मुंबईतील संपत्तीचा करार केल्याचा हुमायूंवर आरोप आहे. तसेच प्रफुल्ल पटेल संबंधीत डीलच्या संदर्भात या व्यक्तीला भेटले होते, असे ईडीच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे, त्यामुळे प्रफुल्ल पटेलांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी मिर्चीसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार केलेले नसल्याचे सांगत निवडणुकीच्या तोंडावर आपल्याविरोधात राजकीय षङयंत्र रचल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन केला होता.

वरळीत ‘सीजे हाऊस’ या इमारतीची पुनर्बाधणी पटेल यांच्या कंपनीने केली होती. या इमारतीमध्ये दाऊदचा विश्वासू सहकारी इक्बाल मिर्ची याच्या पत्नीच्या नावे सदनिका आहे. मिर्ची याची पत्नी हजरा मिर्ची हिने पटेल यांच्या कंपनीशी व्यवहार केला होता. तसेच सदनिका खरेदीच्या करारावर प्रफुल्ल पटेल आणि हजरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दाऊदच्या सहकाऱ्याच्या पत्नीशी पटेल यांनी आर्थिक व्यवहार केला असून, त्यातून पटेल यांना आर्थिक फायदा झाल्याचे अंमलबजावणी संचालनालयाचे म्हणणे आहे.

या व्यवहाराच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावत १८ ऑक्टोबर २०१९ रोजी मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. हवाई वाहतूक मंत्री असताना झालेल्या काही आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात अलीकडेच अंमलबजावणी संचालनालयाने पटेल यांची चौकशी केली होती.