उत्तर प्रदेशमधील फरार गुन्हेगार आणि मिर्ची गँगचा प्रमुख असणाऱ्या आशू जाट याला हापूड पोलिसांनी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने विलेपार्ले येथून अटक केली आहे. आशूवर अडीच लाखांचे बक्षिसही आहे. भाजपा नेता राकेश शर्मा आणि नोएडामधील एक्झीक्युटीव्ह गौरव चंदेल यांच्या हत्या प्रकरणात पोलीस आशूच्या मागावर होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशू वेशांतर करुन मुंबईमध्ये राहत होता. त्याने आपली दाढी वाढवलेली आणि तो जोगेश्वरीमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करायचा. मुंबई पोलिसांनीच यासंदर्भातील माहिती ट्विटवरुन दिली आहे.

हत्या, चोरी आणि अपहरणासारखे ५१ गुन्हे आशूवर दाखल आहेत. त्याच्या पत्नीला आणि टोळीत अन्य सदस्यांना पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच ताब्यात घेतलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार आशूने उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष दलाकडून आपला एन्काऊंटर होईल अशी भीती व्यक्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशू विलेपार्ले येथे एका भाड्याच्या खोलीमध्ये एकटाच राहत होता. त्याने उत्तर प्रदेशमधील आपल्या गँगमधील एका व्यक्तीला फोन केला होता. त्याने केलेल्या याच एका फोन कॉलमुळे आम्ही त्याच्यापर्यंत पोहचू शकलो असं पोलिसांनी सांगितलं.

मुंबईचे पोलीस उपायुक्त (गुन्हे) अकबर पठाण यांनी ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश पोलिसांनी मागील आठवड्यामध्ये आशू मुंबईमध्ये लपून बसल्याची माहिती दिली होती. यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील माने आणि उप निरीक्षक शरद जीने हे तीन दिवस भाजी विक्रेता म्हणून विलेपार्ले परिसरामध्ये गस्त घालत होते. माने यांनी दिलेल्या माहितीनुसार आशूने स्वत:चा फोन स्वीच ऑफ ठेवला होता. तो बाजारामध्ये भाजीचं एक छोटं दुकान चालवायचा. उत्तर प्रदेश पोलिसांनी पाठवलेला आशूचा फोटो खूपच जुना होता. त्यामुळे त्याच्या मदतीने आशूचा ओळखणं खूपच कठीण होतं.

माने यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम महानगर पालिकेचे अधिकारी म्हणून आशूच्या दुकानावर पोहचले आणि त्याला ताब्यात घेतलं. आशू आणि त्याचा भाऊ भोलू यांची २५ जणांची एक टोळी आहे. या टोळीचे नाव मिर्ची गँग असं आहे. या टोळीतील चोर लोकांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून चोऱ्या करायचे. नोएडा, गाझियाबाद, हापूडसारख्या परिसरामध्ये या टोळीतील सदस्यांविरोधात हत्या, अपहरण आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत.