महिलेला चुकून धक्का लागल्यानंतर झालेल्या वादावादीत लोकलसमोर ढकलून प्रवाशाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत मनिषा ललित खाकडिया या महिलेला अटक केली आहे. याप्रकरणी अजून एका व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. शनिवारी मुलुंड रेल्वे स्थानकात ही धक्कादायक घटना घडली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलुंड येथील ५६ वर्षीय दीपक पटवा शनिवारी दुपारी फलाटावरून जाताना त्यांचा एका महिलेला चुकून धक्का लागला. यासाठी त्यांनी त्या महिलेची माफीही मागितली पण ती महिला आणि तिच्यासोबत असलेल्या एका पुरुषाने पटवा यांना उपनगरी गाडीखाली ढकलले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. या घटनेमुळे पटवा यांच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता.

स्थानकात घटनेच्या वेळी अनेक प्रवासी होते. मात्र दीपक आणि या महिलेमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही. पटवा यांचा मुलुंड परिसरातच लोखंड खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. फलाट क्रमांक तीनवर कल्याणला (डाऊन जलद) जाणारी उपनगरी गाडी येत असतानाच त्या दोघांनी पटवा यांना गाडीखाली ढकलले आणि पळ काढला. गाडीखाली आल्याने पटवा यांचा मृत्यू झाला. फलाटावरील काही प्रवाशांनी ही बाब लोहमार्ग पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला. कुर्ला रेल्वे पोलिसांनी शनिवारी केवळ घटनेची नोंद करत तपास सुरू केला. दीपक यांचे मेहुणे अजित शहा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. प्रत्यक्षदर्शीनी समोर यावे आणि या आरोपींची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव यांनी केले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman arrested in murder case
First published on: 24-04-2018 at 19:38 IST