मुंबई लोकलने प्रवास करताना मोबाइल चोरी होण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. यासाठी बऱ्याचदा लोकलच्या दरवाजावर उभ्या असलेल्या प्रवाशांना टार्गेट केलं जातं. अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये मोबाइल चोरांमुळे तरुणीला आपला जीव गमावावा लागला असता. कॉटन ग्रीन आणि शिवडी स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. सुदैवाने तरुणीला गंभीर इजा झालेली नाही. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय झालं –
परळची रहिवासी असणारी प्रगती सरफरे २० डिसेंबरला संध्याकाळी कामावरुन परतत होती. संध्याकाळी ७ ते ७:१५ दरम्यान तिने पनवेल ट्रेन पकडली. शिवडी स्थानकाला उतरणार असल्याने कॉटन ग्रीन स्थानकानंतर ती दरवाजात येऊन उभी राहिली. लोकल ट्रेन कॉटन ग्रीन आणि शिवडीच्या मधे असतानाच अचानक तिच्या हातावर जोरात फटका बसला आणि हातातला मोबाइल खाली पडला. प्रगतीला काही वेळासाठी काय झालं हे कळलंच नाही.

प्रगती शिवडी स्थानकावर उतरली तेव्हा आरडाओरडा सुरु झाला होता कारण लोकलमधील अजून एका मुलाचाही मोबाइल चोरीला गेला होता. यानंतर स्थानकावर उपस्थित आरपीएफ जवानांनी लगेचच घटना घडली त्या दिशेने धाव घेतली पण तोपर्यंत चोर तेथून पळून गेले होते.

प्रगतीचा पती सुशांतने लोकसत्ता ऑनलाइनला दिलेल्या माहितीनुसार, “प्रगती आणि मी तक्रार करण्यासाठी पोहोचलो असता वडाळा स्टेशनला जाण्यास सांगण्यात आलं. घरात कोणी नसल्याने आम्ही आमच्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन वडाळा स्टेशनला पोहोचलो. अखेर दोन तासांनी आमची तक्रार नोंदवण्यात आली”.

आणखी वाचा- पुणे : गे जोडीदाराचं ठरलं लग्न… वेगळं होण्याच्या भीतीतून केली जोडीदाराचीच हत्या

“पोलिसांनी आम्हाला तुमचा मोबाइल मिळेल असंही सांगितलं. उद्या मोबाइल मिळेलही, मुद्दा तो नाही. मोबाइल काय उद्या पुन्हा पैसे कमावून घेऊ शकतो. पण या घटनेत माझ्या पत्नीचं काही बरं-वाईट झालं असतं तर त्याला जबाबदार कोण? कारवाई करण्यासाठी काही तरी अघटितच झालं पाहिजे असं काही आहे का? मोबाइलसाठी आमच्यासारख्या सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या नराधमांवर कडक कारवाई केली पाहिजे,” असं सांगताना सुशांतला भावना अनावर होत होत्या.

IMEI नंबर ब्लॉक
मोबाइल हरवल्यानंतर आपण अनेकदा मोबाइल गेला म्हणत सीम कार्ड ब्लॉक करतो. पोलीस तक्रार केल्याशिवाय नवीन सीम कार्ड मिळत नाही यामुळे तक्रार करणं अनिवार्य असतं. पण आता तुम्ही थेट आपला मोबाइल IMEI नंबरही ब्लॉक करु शकता. जेणेकरुन मोबाइल चोरीला गेला असला तरी तो निरुपयोगी असेल अगदी खेळण्यातल्या मोबाइलसारखा. दूरसंचार विभागाकडे तक्रार केल्यानंतर २४ तासांत तुमचा मोबाइल पूर्णपणे बंद होतो.
तक्रार कुठे करावी – https://ceir.gov.in/Home/index.jsp

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman attacked for mobile at sewri railway station sgy
First published on: 02-03-2021 at 14:57 IST