परिस्थिती कितीही कठीण असली तरी काही जण त्यावर मात करुन यश मिळवतात. संकटांसमोर ते खचून जात नाहीत. परिस्थितीशी लढा देतात. कुर्ल्यात झोपडीमध्ये राहणाऱ्या जयकु्मार वैद्यने सुद्धा आपल्या मेहनतीने इतरांना प्रेरणा देणारी कामगिरी करुन दाखवली आहे. टीआयएफआरमध्ये माजी संशोधक असलेला जयकुमार आज पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. यातील कौतुकाची बाब म्हणजे अमेरिकेतील विद्यापीठाने त्याला शिक्षणासाठी तिथे येण्याचे निमंत्रण दिले आहे. जयकुमार वैद्य ज्या ठिकाणी राहतो तिथली परिस्थिती अनुभवल्यानंतर खरोखर तुम्हाला त्याच्या यशाचे कौतुक वाटेल. अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठात जयकुमार पीएचडी करणार आहे.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये ज्यूनियर संशोधक म्हणून काम करत असताना जयकुमारचे दोन वैज्ञानिक पेपर प्रतिष्ठेच्या इंटरनॅशनल जर्नल्समध्ये प्रकाशित झाले होते. त्या आधारावर व्हर्जिनिया विद्यापीठाने पीएचडी करण्यासाठी त्याला तिथे बोलावले. कुर्ल्यातील एका छोटयाशा खोलीतून जयकुमारचा प्रवास सुरु झाला. त्याला आईनेच लहानाचे मोठे केले. कारण जयकुमारच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे. जयकुमारची आई नलिनी घरचा खर्च भागवण्यासाठी छोटी-मोठी कामे करायची.

त्याशिवाय न्यायालयात घटस्फोटाचा खटलाही सुरु होता. बेताची परिस्थिती असल्यामुळे जयकुमारच्या कुटुंबाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता. वडापाव, समोसे आणि ब्रेड खाऊन दिवस काढल्याची आठवण जयकुमारने सांगितली. घरात आजही सेकंड हँड फ्रिज आणि टीव्ही आहे. ७५ स्कवेअर फुटच्या रुममध्ये जयकुमार वैद्यने इंजिनिअरींगपर्यंतचे शिक्षण घेतले.

दुसऱ्यांच्या घरात डिस्कव्हरी चॅनल पाहून जयकुमारच्या मनात शास्त्रज्ञ बनण्याची इच्छा निर्माण झाली. आजचा नसला तरी उद्याचा दिवस चांगला असेल. तुम्ही मेहनती, आशावादी आणि संयमी असाल तर सर्व काही शक्य आहे असे जयकुमार म्हणाला. काही ट्रस्टच्या मदतीमुळे शिक्षण घेण्याच्या त्याच्या स्वप्नांना बळ मिळाले. शाळेत असतानाच जयकुमार एका टीव्ही रिपेअर करण्याच्या दुकानात काम करायचा. तिथे त्याला महिन्याकाठी चार हजार रुपये मिळायचे. केजे सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमधून जयकुमार इलेक्ट्रीकल इंजिनिअरची पदवी घेतली. कॉलेजमध्ये असताना रोबोटिक्समध्ये त्याने राष्ट्रीय स्तरावरचे तीन आणि राज्य स्तरावरचे चार पुरस्कार मिळवले. त्यामुळे त्याला लार्सन अँड टुब्रो सारख्या कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली.

२०१६ साली टीआयएफआरमध्ये रुजू झाल्यानंतर जयकुमारला महिना ३० हजार रुपये वेतन मिळायचे. या पगारामुळे जयुकमारच्या कुटुंबाला थोडे सुखाचे दिवस आले. त्याने घराची दुरुस्ती केली. अलीकडेच त्याने घरीही एसी सुद्धा लावून घेतला आहे. वैद्यने कष्टाने कमावलेला पैसा जीआरई आणि टीओईएफएल परिक्षेसाठी खर्च केला. जयकुमारला विद्यावेतन म्हणून व्हर्जिनिया विद्यापीठाकडून वार्षिक २३,४०० डॉलर्स मिळणार आहेत. जयकुमारला हार्डवेअर टेक्नोलॉजीमध्ये भारताला स्वावलंबी झालेले पाहायचे आहे. त्या तंत्रज्ञानावर तो काम करणार आहे. पुढच्या दोन वर्षात त्याला आईलाही अमेरिकेला न्यायचे आहे.