25 February 2021

News Flash

निराधारांची लूट!

झटपट काम करून देण्यासाठी एक हजार रुपयांची वसुली

आधार नोंदणीसाठी लागणाऱ्या रांगांचा दलालांकडून गैरफायदा; झटपट काम करून देण्यासाठी एक हजार रुपयांची वसुली

केंद्र सरकारने विविध शासकीय योजनांसाठी आधार नोंदणी सक्तीची केली असून यासाठी ३१ मार्चपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे मुंबईतील सर्वच आधार केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. त्यातच आधार कार्डातील दुरुस्तीसाठीही नागरिक गर्दी करू लागले आहेत. या गर्दीच्या तुलनेत आधार केंद्रे कमी असल्याने नोंदणी वा दुरुस्तीसाठी नागरिकांनी दोन-दोन दिवस घालवावे लागत आहेत. दुसरीकडे, काही ठिकाणी दलालांचाही शिरकाव झाल्याचे दिसून येत असून झटपट काम करून देण्याच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचे दिसून आले आहे.

आधारमधील दुरुस्ती वा नोंदणीसाठीची मुदत आता जेमतेम २० दिवसांवर आली असल्याने सर्वत्र सध्या आधार केंद्राची शोधाशोध सुरू आहे. अद्याप आधार नोंदणी न केलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र त्याहूनही जास्त नागरिक आपल्या आधार कार्डमधील भ्रमणध्वनी क्रमांक, जन्मतारीख वा पत्ता यांच्यातील दुरुस्तीसाठी आधार केंद्रांकडे धाव घेत आहेत. या गर्दीच्या तुलनेत मुंबईतील आधार केंद्रांची संख्या फारच कमी आहे. तीन वर्षांपूर्वी, २०१५ मध्ये मुंबईत ४५१ आधार केंद्रे होती. मात्र सद्य:स्थितीत ही संख्या अवघी ५१ आहे. खासगी केंद्रचालकांनी गैरप्रकार सुरू केल्याने त्यांना या मोहिमेतून हटवण्यात आले. त्यामुळे परिसरातील आधार केंद्र शोधण्यातच नागरिकांचा निम्मा वेळ जात आहे. शिवाय डिसेंबर २०१७ पर्यंत सुरू असणारी सरकारी अधिकृत आधार केंद्राची सेवादेखील नव्या वर्षांत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आधारकार्ड आता कुठे मिळेल यापासून लोकांच्या प्रश्नांची सुरुवात आहे. मात्र त्या ठिकाणीही लोकांची आर्थिक पिळवणूक होताना दिसत आहे. कांदिवलीतील एका आधार केंद्रावर केवळ पत्ता बदलून देण्यासाठी एक हजार रुपये मागितल्याची माहिती तेथील गृहस्थाने दिली. बँकेत आधार नोंदणीसाठी मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार होत आहे. मात्र नागरिकांचा नाइलाज असल्याने ते पैसे देऊन आपले काम करून घेत आहेत. त्याचप्रमाणे ‘महाऑनलाइन’ने नियमबाह्य़ चॅनेल पार्टनर तयार केले असून या ठिकाणीही आर्थिक पिळवणूक होत आहे, असे सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांनी सांगितले.

दादर पूर्वेकडील भोईवाडा परिसरात २०१७ मध्ये तीन आधार केंद्रे होती. यामध्ये नवभारत शाळेच्या शेजारी दिनेश सूर्यवंशी यांच्याकडून संचलित, आविष्कार सामाजिक प्रतिष्ठान संचलित आणि नायगाव रोडवरील टपाल कार्यालयात आधार केंद्र होते. जानेवारीपासून ही दोन्ही खासगी आधार केंद्र बंद झाली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मुख्य कार्यालयामधूनच आधार यंत्र बंद ठेवल्याची माहिती दिनेश सूर्यवंशी संचलित आधार केंद्रावरून मिळाली. तसेच आविष्कार सामाजिक प्रतिष्ठानाचे आधार केंद्रदेखील बंद आहे. राहिल्यास प्रश्न टपाल कार्यालयातील आधार केंद्राचा तर, त्या ठिकाणी असणारा कर्मचारीदेखील १२ मार्चपर्यंत सुट्टीवर गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आधार केंद्राच्या अभावी परवड होत असल्याची माहिती येथील रहिवाशी मनीषा भोईटे यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांपासून परिसरातील आधार केंद्रे बंद झाली आहेत. तसेच टपाल कार्यालयातील आधार केंद्रावरदेखील दिवसाला काही मोजक्याच लोकांचे काम केले जाते आणि सध्या ते काही दिवसांसाठी बंद केले असल्याने परिसरातील लोकांची पंचाईत झाल्याचे त्यांनी सांगितले.

‘३१ मार्चपर्यंत १०० टक्के जोडणी अशक्य’

विविध सेवांकरिता आधार नोंदणीसाठी शासनाने ३१ मार्च शेवटची तारीख दिली आहे. नागरिकांची आधार नोंदणी व दुरुस्ती करण्यासाठी संख्या लक्षात घेता संख्या आधार नोंदणी केंद्र कमी पडतील. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत आधार लिंकची शक्यता कमी आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांनी सांगितले. नागरिकांच्या नावात, जन्मतारखेत चुका होण्याचे प्रमाण जास्त आहे. आधारच्या संकेतस्थळावर केवळ पत्त्यातील दुरुस्ती करण्यात येते. त्यामुळे अन्य दुरुस्तीसाठी नागरिकांना आधार केंद्रच शोधावे लागत आहे. शासनाने आधार केंद्र शासकीय जागेत होईल असे सांगितले. मात्र नागरी वस्ती जवळपास शासकीय जागेत जागा उपलब्ध नाही, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2018 3:14 am

Web Title: aadhaar card scam in mumbai
Next Stories
1 टॉवर उभा; पण घरासाठी प्रतीक्षाच..
2 मुंबईच्या किनाऱ्यावर समुद्री गोगलगायींच्या नव्या प्रजाती
3 विद्यार्थ्यांभोवती दुचाकींचा वेढा
Just Now!
X