News Flash

विद्यार्थ्यांची आधार नोंदणी बंधनकारक!

सवलत योजनांतील गैरव्यवहार टाळण्यासाठी शिक्षण विभागाचे आदेश

सवलत योजनांतील गैरव्यवहार टाळण्यासाठी शिक्षण विभागाचे आदेश

मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध सवलत योजनांमधील गैरव्यवहार टाळण्यासाठी सर्व माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार क्रमांक नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

पुढील सहा महिन्यांत, म्हणजे ३१ मार्च २०२१ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने शासकीय, खासगी अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्व शाळांना दिले आहेत.

राज्यात १ लाख १० हजार ३१५ शाळांमध्ये सुमारे २ कोटी २५ लाख ६० हजार ५७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राज्य शासनाच्या वतीने पोषण आहार, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान, मोफत गणवेश, पाठय़पुस्तक व इतर आनुषंगिक योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. या योजनांचे लाभ गरजू व पात्र विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजेत, अशी शासनाची भूमिका आहे.

लाभार्थी विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध नसेल तर, त्यात गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. त्याला आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या ‘सरल’ या संकेतस्थळावर सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे. यापूर्वी ही प्रक्रिया सुरू केली असली तरी, अद्याप ६४ लाख ५९ हजार ३८८ विद्यार्थ्यांची नोंदणी प्रलंबित आहे. काही विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी झाली आहे, तर अस्तित्वात नसलेल्या काही विद्यार्थ्यांच्याही नोंदी झाल्याचे समोर आले आहे. असे प्रकार टाळण्यासाठी आधार क्रमांक नोंदणी अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करोना साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्व शाळा बंद आहेत. शाळा सुरू होईपर्यंत आधार नोंदणी करू नये, असे ठरविण्यात आले होते. मात्र आता ही नोंदणी तहसील कार्यालय, बँका व टपाल कार्यालयांमधून करून घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

सहा महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश

* ज्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक आहेत (५ ते १५ वर्षे पूर्ण केलेल्या), त्यांच्या हाताच्या अंगठय़ाचा ठसा घेऊन बायोमेट्रिकद्वारे आधार नोंदणी अद्ययावत करून घ्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नाही, त्यांची नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे. सहा महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

* ही प्रक्रिया पार पाडत असताना करोना संसर्गाचे भान ठेवून गर्दी होणार नाही यादृष्टीने नियोजन करणे, सुरक्षित अंतर राखण्याबरोबरच नोंदणी केंद्राचे र्निजतुकीकरण करणे, मुखपट्टीचा वापर इत्यादी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व शाळा व विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाने त्यासंबंधीचा सविस्तर शासन आदेश मंगळवारी काढला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 12:59 am

Web Title: aadhaar registration mandatory for students zws 70
Next Stories
1 उपाहारगृहे, मद्यालये आजपासून खुली
2 स्थायी, शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी आज लढत
3 सुशांत सिंह प्रकरणावरुन मुंबईला बदनाम करण्याचं कारस्थान उघड झालं-किशोरी पेडणेकर
Just Now!
X