‘ज्या तत्परतेने मेट्रोचे अधिकारी आरे काॅलनीतील झाडं तोडत आहेत ते पाहता त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवायला हवं’ अशी जळजळीत टीका युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मेट्रो कारशेड येथील वृक्षतोडीवरुन केली आहे. आरे काॅलनीतील मेट्रोच्या कारशेडप्रकरणी न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यास सुरूवात झाली आहे. या मुद्द्यावरुन ट्विटवर #AareyForest हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. अनेकांनी यासंदर्भात आपला आक्षेप नोंदवला आहे. आदित्य ठाकरे यांनाही ट्विट करुन या कारवाईचा विरोध केला आहे.

आरे विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच प्रशासनाने आरे येथील नियोजित कारशेडच्या परिसरातील झाडे तोडण्यास सुरुवात केली. याच तत्परतेने केलेल्या कारवाईवर आदित्य यांनी ट्विटवरुन संताप व्यक्त केला आहे.

नक्की वाचा > #AareyForest: काही लोकं स्वत:ला न्याययंत्रणेपेक्षा उच्च समजतात- अश्विनी भिडे

‘आरेमधील जैवविविधता संपवण्याचा हा जो घाट रचला आहे तो लज्जास्पद आहे. ज्या तत्परतेने मेट्रोचे अधिकारी आरे काॅलनीतील झाडं तोडत आहेत ते पाहता त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवायला हवं. येथील झाडं तोडण्यापेक्षा या अधिकाऱ्यांनी पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ नष्ट केले तर अधिक बरं होईल ना?,’ अशी टिका आदित्य यांनी ट्विटवरुन केली आहे.

याच ट्विटखाली केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये आदित्य यांनी शिवसैनिकांनी आरेतील वृक्षतोड थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. ‘आरे कारशेड परिसरातील अनेक पर्यावरणवादी तसेच स्थानिक शिवसैनिकांनी वृक्षतोड करण्याचा हा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ज्यापद्धतीने आपण मुंबई मेट्रो तीनसाठी जंगल नष्ट करत आहोत ते पाहता हा प्रकल्प भारताने संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत मांडलेले सर्व दावे खोडून टाकताना दिसत आहे,’ असं आदित्य यांनी म्हटलं आहे.

तिसऱ्या ट्विटमध्ये आदित्य यांनी केंद्र सराकरवर निशाणा साधला असून पर्यावरण संवर्धनावर बोलण्याचा केंद्र सरकारला काहीच अधिकार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ‘पर्यावरणसंदर्भातील समस्या, प्लास्टिकमुळे होणारे प्रदुषण यासारख्या गोष्टींवर केंद्र सरकारने बोलण्यात काहीच अर्थ नाही. मुंबई मेट्रो ३ प्रकल्पामुळे आरेच्या वनक्षेत्राचे नुकसान होत आहे. ही लढाई अहंकाराची लढाई असल्यासारखे काम मेट्रोकडून केले जात असल्याने या मेट्रोचा मूळ उद्देशच संपला आहे,’ असे आदित्य म्हणाले आहेत.

मात्र शुक्रवारी न्यायालयाने आरेसंदर्भातील सर्व याचिका फेटाळून लावत मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड करण्यास परवानगी मिळल्यानंतर रात्री आठच्या सुमारास आरेमध्ये वृक्षतोड करण्यास सुरुवात केली. नेटकऱ्यांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला. अनेकांनी आदित्य ठाकरे कुठे आहेत असा सवाल ट्विटवरुन उपस्थित केला आहे.

 

नक्की वाचा > #AareyForest: आरेसाठी पर्यावरणवादी मध्यरात्री आंदोलनाला बसले, संघर्ष तापण्याची चिन्हे

आदित्य काय म्हणाले होते मेट्रोबद्दल

आमचा मेट्रो रेल्वेला विरोध नाही, पण आरेमध्ये कारशेड बांधण्यामुळे तेथील जैवविविधता नष्ट होण्याचा व मुंबईला पुराचा धोका असल्याने पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे. मेट्रो रेल्वेचे अधिकारी मात्र आरेमध्ये कारशेड न झाल्यास मेट्रो-३ अशक्य असल्याची धमकी धमकी देत आहेत, अशा शब्दांत आदित्य यांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर टीकास्त्र सोडले. सप्टेंबर महिन्याच्या १० तारखेला आदित्य यांनी या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असल्याचे स्पष्ट केले होते. ‘आरे’मधील कारशेडच्या विरोधातील आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर आदित्य यांनी आरेमधील मेट्रोच्या कारशेडला विरोध करण्यासाठी शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. कारशेडसाठी इतर जागांचा पर्याय असताना ‘आरेच का रे’, असा सवाल ठाकरे यांनी केला. राजकीय हेतूने नाही तर मुंबईकर म्हणून आरे कारशेडला विरोध करत आहोत अशी भूमिका आदित्य यांनी यावेळी बोलताना मांडली होती.

मांडा तुमचे मत

दरम्यान, शुक्रवारी न्यायालयाने दिलेल्या निर्णयामध्ये आरेतील कारशेड मेट्रोसाठी आवश्यक असल्याचे व आरे हे जंगल नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे ग्राह्य ठरवले व वृक्षप्राधिकरणाचा झाडे तोडण्यास परवानगी देण्याचा निर्णय ग्राह्य असल्याचा निवाडा दिला.  मात्र प्रशासनाने अवेळी कारवाई केल्याचे व अपिलाची मुदत न पाळल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.