04 December 2020

News Flash

मुंबई सेंट्रलमधील आग ३५ तासांनंतरही धुमसतीच; आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट

आगीमध्ये मॉलचे दोन मजले पूर्णपणे जळून खाक झाले आहेत

मुंबई सेंट्रल परिसरात सिटी सेटर मॉलला गुरुवारी रात्री लागलेली आग अद्यापही धुसमत असून विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीमध्ये मॉलचे दोन मजले पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. आग लागल्यानंतर मॉलच्या दुस ऱ्या-तिसऱ्यामजल्यावरील एकामागून एक दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडत होती. तब्बल पाच तासांहून अधिक काळ प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आगीवर नियंत्रण मिळत नसल्यामुळे अखेर अग्निशमन दलाने ‘ब्रिगेड कॉल’ची घोषणा केली होती. आगीचे रौद्ररूप आणि धुमसणारा धूर यांमुळे अग्निशमनात अनेक अडथळे येत होते. आगीवर नियंत्रण मिळवताना एक उपअग्निशमन अधिकारी आणि चार जवान जखमी झाले.

आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर यासंबंधी माहिती देताना आपण प्रत्येक क्षणाचे अपडेट घेत असल्याचं सांगितलं आहे. “सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नसून आपले शूर जवान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत,” असं म्हटलं आहे. आग विझवण्यासाठी रोबोटचा यशस्वीपणे वापर करण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

मुंबई सेंट्रल बेस्ट बस आगारासमोरील सिटी सेंटर मॉलमधील दुसऱ्यामजल्यावर गुरुवारी रात्री ८.५३ च्या सुमारास आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. मात्र मॉलमधील मोबाइल, लॅपटॉप आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानांमध्ये आगीचा भडका उडत होता. दुसऱ्यामजल्यावरील आग तिसऱ्यामजल्यावर पोहोचली आणि आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. धुराचे साम्राज्य अवघ्या मॉलमध्ये पसरू लागले होते. अखेर गुरुवारी मध्यरात्री २.४१ च्या सुमारास अग्निशमन दलाने ‘ब्रिगेड कॉल’ जाहीर केला.

क्षणाक्षणाला आगीचा भडका वाढू लागल्यामुळे अग्निशमन दलाची अधिक कुमक मागविण्यात आली. अग्निशमन दलाचे २४ बंब, १७ जम्बो टँकर, सहा पाण्याचे टँकर यांसह ५० अग्निविमोचन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्यासह एकूण २५० अधिकारी आणि अग्निशामक आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. अग्निशमन दलाच्या जवानांप्रमाणेच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमनात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पोलीस तैनात होते.

३५०० रहिवाशांची सुटका
सिटी सेंटर मॉलजवळच ‘ऑर्किड एन्क्लेव्ह’ ही ५५ मजली इमारत आहे. मॉलला लागलेली आग भडकू लागताच मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ उठू लागले. खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी ‘ऑर्किड एन्क्लेव्ह’मधील तब्बल तीन हजार ५०० रहिवाशांना सुरक्षितपणे इमारतीतून खाली उतरविले. काही रहिवासी आपल्या नातेवाईकांच्या घरी निघून गेले. तर काही रहिवाशांची जवळच्या मैदानात व्यवस्था करण्यात आली होती.

एक अधिकारी, चार जवान जखमी
सिटी सेंटर मॉलला लागलेली आग विझविताना अग्निशमन दलातील उपअग्निशमन अधिकारी गिरकर (५०), अग्निशामक रवींद्र प्रभाकर चौगुले (५३) जखमी झाले, तर शामराव बंजारा (३४), भाऊसाहेब बदाणे (२६), संदीप शिर्के यांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे या दोघांनाही तात्काळ जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

मोबाइलच्या बॅटरीला लागलेली आग भडकली
सिटी सेंटर मॉलच्या दुसऱ्यामजल्यावरील एका दुकानातील मोबाइलच्या बॅटरीने पेट घेतला आणि काही क्षणात हा संपूर्ण मजला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला, असा निष्कर्ष प्राथमिक पाहणीतून काढण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 8:14 am

Web Title: aaditya thackeray visited the city centre mall in nagpada where a fire broke out sgy 87
Next Stories
1 परीक्षा घेण्याच्या सूचना नसल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे शाळांना पत्र
2 ‘सिटी सेंटर’मध्ये अग्नितांडव
3 दुकानांची राखरांगोळी, लाखोंचे नुकसान
Just Now!
X