आपल्यावरील आरोपांच्या चौकशीची आशीष शेलार यांचीही मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोणताही व्यवसाय न करता काही लाखांच्या भागभांडवलावर मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड्. आशीष शेलार यांची गुंतवणूक असलेल्या सर्वेश्वर लॉजिस्टिक कंपनीची सहा वर्षांत १८ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता कशी झाली, असा सवाल करीत ‘आम आदमी’ पक्षाच्या प्रीती मेनन यांनी शेलार यांच्या कंपन्यांची व आर्थिक उलाढालींची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अंमलबजावणी संचालनालय यासह विविध यंत्रणांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. तर हे आरोप फेटाळून लावत अ‍ॅड्. शेलार यांनीही सत्य बाहेर येण्यासाठी चार कंपन्यांच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. ‘आप’विरोधात बदनामीचा खटला दाखल करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

मेनन यांनी अ‍ॅड्. शेलार यांच्या सर्वेश्वर, रिद्धी डीलमार्क, ऑपेरा रिअ‍ॅल्टर्स अशा कंपन्यांमधील गुंतवणूक, उलाढाल व व्यवहारांबाबत आक्षेप घेत आरोप केले. या कंपन्यांमधील गुंतवणूक अ‍ॅड्. शेलार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रातही न दाखविल्याचे त्यांनी सांगितले. सर्वेश्वर कंपनी २०१० मध्ये स्थापन झाली. कोणताही व्यवसाय न करता आणि गेल्या पाच वर्षांतील वार्षिक उत्पन्न केवळ १०-१५ हजार रुपये असताना कंपनीकडे पहिल्याच वर्षी तीन कोटी ६० लाख रुपये समभागरूपाने आले आणि कर्ज व अग्रिम स्वरूपात २६ लाख रुपये आले. सहा कोटी रुपयांचे योग्य तारण नसलेले कर्ज पुढील वर्षी मिळाले. कंपनीची कर्जे सध्या १४ कोटी २४ लाख रुपयांची असून मालमत्ता १८ कोटी ४६ लाख रुपयांची आहे. याची चौकशी करण्याची मागणी मेनन यांनी केली आहे.

रिद्धी डीलमार्क या कोलकत्ता येथील कंपनीचे समभाग अ‍ॅड्. शेलार व त्यांचे खासगी सचिव प्रकाश पाटील यांनी विकत घेतले. या कंपनीत पहिल्या वर्षी २० लाख रुपये समभाग रूपाने गुंतवणूक झाली. ही रक्कम शेलार यांच्या सर्वेश्वर कंपनीत गुंतवण्यिात आली असताना त्याचा उल्लेख त्या कंपनीच्या वित्तीय ताळेबंदात नाही. रिद्धी कंपनीच्या संचालकपदाचा उल्लेख शेलार यांच्या प्रतिज्ञापत्रात नाही. रिद्धी कंपनीची वार्षिक सभा २८ सप्टेंबर २०१२ रोजी कोलकत्ता येथे दुपारी बारा वाजता झाली व सर्वेश्वर कंपनीची बेलापूर येथे दुपारी साडेबाराला बेलापूरला झाली. ३० सप्टेंबर २०१४ रोजीही अशा दोन ठिकाणी वार्षिक सभा झाल्या. एकाच दिवशी व वेळेत या सभांना अ‍ॅड्. शेलार हे उपस्थित असल्याची नोंद कशी, असा सवालही मेनन यांनी केला आहे.

अ‍ॅड्. शेलार यांनी या आरोपांचा इन्कार करीत चौकशीसाठी तयार असल्याचे सांगितले. सर्वेश्वर व रिद्धी कंपन्यांमध्ये ४५ लाख रुपयांची एकूण गुंतवणूक असून त्याची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात एकत्रित स्वरूपात दिलेली आहे. वैयक्तिक हमीवर सहा कोटी रुपयांचे कर्ज १४.५ टक्के इतक्या व्याजदराने घेण्यात आले असल्याचे सांगून वार्षिक सभांना एकाच वेळी दोन्ही ठिकाणी हजर नव्हतो व तसे पत्रही दिले असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. आपल्याविरोधात राजकीय हेतूंनी कारस्थान रचले गेले असल्याचा दावा त्यांनी केला.

व्यवसाय करता न आल्याबद्दल शल्य

तीन-चार कंपन्या स्थापन करून त्यातून काहीच व्यवसाय करता न आल्याबद्दल व त्यातील दोन बंद कराव्या लागल्याबद्दल आपल्याला शल्य वाटत असल्याचे अ‍ॅड्. शेलार यांनी पत्रकारांना सांगितले. काँग्रस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत म्हणजे २०१० मध्ये कंपन्या स्थापन करून भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्रात व राज्यात सत्ता आली. ‘मेक इन इंडिया’ आणि उद्योगवाढीचे आवाहन इतरांना करीत असताना ज्येष्ठ भाजप नेते शेलार यांनी मात्र कंपन्या बंद केल्या. त्यांच्यासारख्या राजकारण्यांना उद्योग सुरू ठेवणे कठीण असेल, उद्योजकांना किती त्रास होतो, असे विचारता मला व्यवसाय करता न आल्याबद्दल ‘शल्य’ असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.