माझ्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या पोलीस सुरक्षारक्षकांचा वेळ शहरातील इतर कोणत्याही चांगल्या उद्देशासाठी सत्कारणी खर्ची करता येईल, अशी प्रतिक्रिया देत बॉलीवूड अभिनेता आमीर खानने बॉलीवूड कलाकारांना देण्यात आलेल्या पोलीस सुरक्षेत कपात करण्याच्या मुंबई पोलिसांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
बॉलीवूडमधील आघाडीचे अभिनेते शाहरुख आणि आमीर खान यांच्यासह २५ जणांच्या पोलीस सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतल्याची माहिती माध्यमांनी प्रसिद्ध केली होती. मुंबई पोलिसांच्या या निर्णयाबाबत आमीर ट्विटरवर आपली प्रतिक्रिया नमूद केली. मला देण्यात आलेल्या पोलीस सुरक्षेत कपात करण्याच्या मुंबई पोलिसांच्या निर्णयाचे मी समर्थन करतो. माझ्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या पोलीस सुरक्षा रक्षकांचा माझ्या सुरक्षेऐवजी शहराच्या सुरक्षेसाठी किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी उपयोग करून घेता येऊ शकेल. मुंबई पोलिसांना जेव्हा गरज वाटेल तेव्हाच त्यांनी माझ्या सुरक्षेत वाढ करावी. मुंबई पोलिसांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे, असे ट्विट आमीरने केले आहे.
बॉलीवूडमधील आघाडीचे अभिनेते शाहरुख खान आणि आमीर खान यांच्यासह २५ जणांच्या पोलीस सुरक्षेत कपात करण्यात आल्याचे वृत्त मुंबई पोलिसांनी शुक्रवारी फेटाळले. बॉलिवूडमधील कलाकारांना सध्या पुरविण्यात येत असलेल्या सुरक्षेत कसलीही कपात करण्यात आलेली नाही, असे मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले. ट्विटरवर एका वृत्तसंस्थेच्या ट्विटला उत्तर देताना मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली.