प्रसिद्ध हॉलीवूडपट ‘फॉरेस्ट गम्प’चा अधिकृत रिमेक

वर्षभरात एकच चित्रपट हे गणित कसोशीने सांभाळणारा बॉलीवूड अभिनेता आमिर खान ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’नंतर कोणता चित्रपट करणार, याबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू होते. गुरुवारी ५४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या प्रश्नाचे उत्तर देत ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने सगळ्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे. प्रसिद्ध हॉलीवूडपट ‘फॉरेस्ट गम्प’चा अधिकृत रिमेक करणार असल्याची घोषणा आमिर खानने यावेळी माध्यमांशी बोलताना केली. ‘लाल सिंग चढ्ढा’ या नावाने हा रिमेक प्रदर्शित होणार आहे.

आमिर खान दरवर्षी वाढदिवस घरच्यांबरोबर साजरा करतो. यावर्षीही नेहमीच्या पद्धतीने कुटुंबाबरोबर हा खास दिवस साजरा करणाऱ्या आमिरने आगामी चित्रपटाची घोषणा करण्यासाठी माध्यमांशीही संवाद साधला.

‘फॉरेस्ट गम्प’ ही  विन्स्टन ग्रुम यांची कादंबरी १९८६मध्ये  प्रकाशित झाली होती. त्यानंतर १९९४ मध्ये याच नावाने हॉलीवूडपट प्रदर्शित झाला. ज्यात हॉलीवूड अभिनेता टॉम हँक्स यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाने त्यावर्षी सवरेत्कृष्ट चित्रपट, सवरेत्कृष्ट दिग्दर्शक, सवरेत्कृष्ट अभिनेता असे सहा ऑस्कर पुरस्कार जिंकले होते. आजही टॉम हँक्सचा ‘फॉरेस्ट गम्प’ रसिकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटाचे हक्क पॅरामाऊंट स्टुडिओकडून विकत घेतले असल्याची माहिती त्याने दिली. हिंदीत ‘लाल सिंग चढ्ढा’ या नावाने हा चित्रपट प्रदर्शित होणार असून ‘वायकॉम १८’ आणि ‘आमिर खान प्रॉडक्शन’ संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. मी या चित्रपटात लाल सिंगची मुख्य भूमिका करतोय. इतर कलाकारांची निवड अजून व्हायची आहे, पण आम्ही चित्रपटाच्या तयारीला सुरुवात केली आहे. या भूमिकेसाठी मला २० किलो वजन कमी करावे लागणार आहे. पुढचे सहा महिने मला तयारीसाठी लागतील, अशी माहिती आमिरने दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शन आमिरच्याच ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटाचा दिग्दर्शक अद्वैत चंदन करणार असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली नसली तरी साधारणपणे २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.

‘चित्रपटात सकारात्मक दृष्टिकोन’

‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाची कथा मला नेहमीच आवडते. या चित्रपटातील लाल ही व्यक्तिरेखा आणि त्याची कथा आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहायला शिकवते, अत्यंत सुंदर आणि सगळ्या कुटुंबाने मिळून पाहावा असा हा चित्रपट आहे. त्यामुळे त्याचा रिमेक करण्यासाठी होकार दिल्याचे आमिरने सांगितले. अभिनेता अतुल कुलकर्णी याने या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.