मुंबई : ‘आरे’मधील कारशेडच्या जागेवरील झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींवर पोलिसांनी केलेल्या अन्यायकारक कारवाईची चौकशी करण्याची मागणी आम आदमी पार्टीने (आप) केली आहे.

‘पोलीस परिमंडळ- १२’चे अधिकारी तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या वागणुकीबद्दल या पत्रात निषेध करण्यात आला आहे. ‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारी मंडळाच्या सदस्य आणि प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि पोलीस महासंचालक यांना या मागणीचे पत्र बुधवारी पाठवले आहे.

शुक्रवारी उच्च न्यायालयाने वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयास आव्हान देणारी याचिका फेटाळून लावल्यावर एमएमआरसीएलने रात्रीच झाडे तोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुंबईच्या कानाकोपऱ्यांतून ३००-४०० पर्यावरणप्रेमी निषेध करण्यासाठी एकत्र आले होते. या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले, तर २९ जणांना अटक केली. ही कारवाई सुरू असताना प्रीती शर्मा या स्वत: तेथे उपस्थित होत्या.

पोलिसी बळाचा अतिरेकी वापर होत असल्याचे त्यांनी पाहिल्याचे पत्रात नमूद केले आहे. शुक्रवारी रात्री जमावबंदीचा आदेश नसतानाही नागरिकांना ताब्यात घेण्याची कृती आणि कोणताही गुन्हा दाखल न करता महिला आणि मुलींना रात्रभर पोलीस ठाण्यात थांबवून ठेवणे हे बेकायदा असल्याचा आरोप त्यांनी   केला आहे.

शनिवारी पहाटेपासून जमावबंदी लागू झाल्यानंतर एकटय़ादुकटय़ा व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतल्याबद्दल कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे. या सर्व घटनाक्रमाचे चित्रीकरण त्यांच्याकडे असल्याचा दावा प्रीती शर्मा मेनन यांनी केला आहे.