दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांच्या कंपूच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा निषेध करीत, महाराष्ट्रातील आम आदमी पक्षातील (आप) अनेक ज्येष्ठ व आघाडीचे कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडत आहेत. योगेंद्र  यादव यांच्या भूमिकेचे समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांची रविवारी ठाणे येथे बैठक होणार आहे. त्या बैठकीत पुढील राजकीय वाटचालीबद्दलची दिशा ठरविली जाणार आहे, असे सांगण्यात आले. गेल्या महिन्यात दिल्लीत झालेल्या आपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांना ज्या पद्धतीने अवमानित करण्यात आले, त्याचा निषेध म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला. केजरीवाल व त्यांच्या कंपूच्या अरेरावीवर बरेच कार्यकर्ते नाराज असून ते पक्षातून बाहेर पडत आहेत. राज्यातील आपचे एक आघाडीचे व ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सोलापूर मतदारसंघातून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढलेले ललित बाबर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.