07 April 2020

News Flash

राज्यातील पालिका निवडणुकीच्या रिंगणात ‘आप’ही

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात पर्याय देण्याचा प्रयत्न - खासदार संजय सिंग

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात पर्याय देण्याचा प्रयत्न – खासदार संजय सिंग

मुंबई : धर्माच्या आधारे ध्रुवीकरण किंवा जातीधर्मात तेढ निर्माण करणाऱ्या भाजपला नाकारून पाच वर्षे चांगले काम केलेल्या आम आदमी पक्षाला दिल्लीकरांनी पुन्हा संधी दिली. हाच कल कायम राहिल्यास देशभर ‘आप’चा पर्याय उभा  राहू शकतो, अशी भूमिका पक्षाचे नेते खासदार संजय सिंग यांनी शुक्रवारी मांडली. एप्रिल महिन्यात होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेसह भविष्यातील राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका पक्ष लढविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

धर्माच्या आधारवर मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपने दिल्लीत केला होता. पण मतदारांनी आरोग्य, शिक्षण, वाहतूक, पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये चांगले काम केलेल्या आम आदमी पार्टीलाच पसंती दिली, असे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजाविणारे राज्याचे प्रभारी संजय सिंग यांनी मुंबई प्रेस क्लबने आयोजित केलेल्या वार्तालपात सांगितले.

आम आदमी पार्टीने महिलांना मोफत प्रवास, २०० युनिटपर्यंत मोफत वीज, स्वस्त पाणी अशा सवलती देऊन अर्थकारण बिघडविल्याचा आरोप केला जातो. पण हा आरोप सिंग यांनी फेटाळला. आम आदमी पार्टी सत्तेत आली तेव्हा दिल्लीत वीज गळतीचे प्रमाण ३५ टक्के होते ते आता आठ टक्क्य़ांपर्यंत घटले. वीज कंपनी अव्वाच्या सव्वा दर वसूल करीत होती. दणका दिल्यावर वीज कंपनी सरळ झाली. पक्षाची सत्ता येण्यापूर्वी वार्षिक ३२ हजार कोटी रुपये कराच्या माध्यमातून जमा होत असत. गेल्या पाच वर्षांत करवसूली ६० हजार कोटींवर गेली. वीज गळती कमी झाल्याने पैसे उपलब्ध झाले. महसुलाचे प्रमाण वाढल्यानेही सरकारच्या तिजोरीत पैसा आला. यातूनच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने विविध सवलती नागरिकांना दिल्या.  दिल्लीच्या सकल उत्पन्नाचा दर हा ८.६ टक्के असून, राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याकडे सिंग यांनी लक्ष वेधले.

शाहीन बाग किंवा अन्य मुद्दय़ांवरून दिल्लीत भाजपने धार्मिक ध्रुवीकरण केले होते. गल्लोगल्ली धार्मिक  उन्माद केला. समाजात तेढ निर्माण केली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दिल्लीकरांनी भाजपला नाकारले. दिल्लीतील विजयाच्या हॅटट्रिकनंतर राष्ट्रीय पातळीवर पक्षाला वाव मिळेल का, या प्रश्नाच्या उत्तरात सिंग म्हणाले, दिल्लीत पाच वर्षे चांगली कामे केल्यानेच लोकांचा भरघोस पाठिंबा मिळाला. काम करणाऱ्यांना लोकांनी स्वीकारण्याचे राजकारण यशस्वी झाल्यास देशभर ‘आप’ला संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘महाराष्ट्रात पक्षवाढीवर भर’

एप्रिल महिन्यात होणारी नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी दिली. दोन वर्षांनी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व महानगरपालिका तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष ताकदीने उतरेल, असे संजय सिंग यांनी जाहीर केले. महाराष्ट्रात पक्षाकडे नेतृत्वाचा अभाव असला  तरी हा प्रश्न सुटेल आणि मतदारांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वासही सिंग यांनी व्यक्त केला. आम आदमी पार्टीचे संघटन काही राज्यांमध्ये फारच कमी आहे किंवा कमकुवत असल्याची कबुली देतानाच त्यांनी, यापुढील काळात पक्ष वाढीवर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. बिहार किंवा अन्य राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तयारी करण्यात येत आहे. पुढील सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत म्हणजे २०२४ पर्यंत आम आदमी पार्टी भाजपला पर्याय म्हणून पुढे यावा, असा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 2:36 am

Web Title: aap will contest all municipal elections in maharashtra says sanjay singh zws 70
Next Stories
1 सावंत आणि वायकर यांच्या मंत्रिपदाच्या दर्जावरून अडचण
2 रुग्णांना डायलिसीस सेवावाढीचा दिलासा!
3 शासनाकडून राज्यात फॅब तंत्रज्ञानाची परवडणारी घरे
Just Now!
X