शैलजा तिवले

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस अशा आजारांचे निदान करण्यासाठी आवश्यक चाचण्या अवघ्या ५० आणि १०० रुपयांत उपलब्ध करून देणारी मुंबई महापालिकेची ‘आपली चिकित्सा’ योजना अजूनही बाळसे धरू शकलेली नाही. सुमारे ७९ कोटींच्या या योजनेसाठी सहा महिन्यांपूर्वी करार होऊनदेखील ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली नाही.

विविध साथीच्या आजारांमुळे पालिका रुग्णालयांमध्ये पावसाळ्यात रुग्णांची संख्या दुपटीने वाढते. त्यात सर्वच उपनगरीय रुग्णालयांमध्ये चाचण्या उपलब्ध नाहीत. मुख्य पालिका रुग्णालयांमध्ये चोवीस तास मोफत चाचण्यांची सोय उपलब्ध असल्याने या रुग्णालयांवर भार येतो. चाचण्या वेळेत होत नसल्याने अनेक रुग्ण नाईलाजाने महागडय़ा खासगी प्रयोगशाळांची वाट धरतात. काही ठिकाणी तर रुग्णालयातील डॉक्टरांचे खासगी प्रयोगशाळांशी लागेबांधे असल्याने रुग्णांची लुबाडणूक केली जाते.

या पार्श्वभूमीवर रुग्णांना परवडणाऱ्या दरांमध्ये तातडीने चाचणी उपलब्ध करून देण्यासाठी  पालिकेने ‘आपली चिकित्सा‘ योजना २०१७ साली जाहीर केली. मुळात ही योजना त्याच वर्षी पावसाळ्यात सुरू होणे अपेक्षित होते. मात्र दोन वेळा निविदा सादर करूनही प्रतिसाद न मिळाल्याने जवळपास वर्षभर ही योजना कागदावरच आहे.

नोव्हेंबर २०१८मध्ये ‘मेट्रोपॉलिस हेल्थकेअर’ आणि ‘थायरोकेअर टेक्नॉलॉजीस लिमिटेड’ या वैद्यकीय चाचण्या करणाऱ्या दोन कंपन्यांसोबत पालिकेने करार केला. चार वर्षांकरिता हा सुमारे ७९ कोटी रुपयांचा करार करण्यात आला. यालाही आता सहा महिने उलटले आहेत. सुरुवातीला १०१ रुपयांमध्ये मुलभूत चाचण्या आणि २०० रुपयांत प्रगत चाचण्या करण्याचे या करारामध्ये नमूद होते. परंतु स्थायी समितीमध्ये या प्रस्तावाला विरोध झाल्याने ५० रुपयांत मुलभूत चाचण्या आणि १०० रुपयांत प्रगत चाचण्या करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. १६ उपनगरीय, ५ विशेष रुग्णालये, १७५ दवाखाने आणि २८ प्रसूतिगृहांमध्ये ही योजना राबविली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पाच दवाखाने आणि दोन उपनगरीय रुग्णालयांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार होती. मात्र, तांत्रिक कारणे आणि त्यानंतर आचारसंहिता अशा कारणांमुळे केवळ एकाच दवाखान्यात ही योजना सुरू झाली आहे, असे  पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.  तसेच पूर्व उपनगरांमधील ४ आणि पश्चिम उपनगरांमधील ३ अशा सात रुग्णालयांमध्ये गेल्याच आठवडय़ात या योजनेला सुरूवात झाली. परंतु, फार मोजक्याच चाचण्या या ठिकाणी करता येत आहेत. प्रगत चाचण्या तर जवळपास कुठेच केल्या जात नाहीत. थोडक्यात ज्या काही मोजक्या रुग्णालयात योजना सुरू झाली आहे.

तातडीने कामकाज सुरू करण्याचे आदेश

योजनेचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीमध्ये दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधीही सहभागी होते. पावसाळ्यात रुग्णांची गर्दी वाढण्यापूर्वी कामकाज तातडीने सर्व रुग्णालये आणि दवाखान्यामध्ये सुरू करावे, असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिल्याचे समजते.

कंपन्यांवर कारवाई करणार

मेट्रोपॉलिस हेल्थकेअर कंपनीला नेमून दिलेल्या रुग्णालयांमध्ये योजना सुरू झाली आहे. थायरोकेअर टेक्नॉलॉजीस लिमिटेडने अजून कामकाज सुरू न केल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले.  दोन्ही कंपन्यांना काम तातडीने सुरू करण्याबाबत वारंवार बजावले असूनही गेल्या सहा महिन्यांमध्ये योजनेची अंमलबजावणी मोठय़ा प्रमाणात झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या कामाचा आढावा घेऊन अशाच रितीने कामामध्ये दिरंगाई राहिल्यास दोन्ही कंपन्यासोबतचा करार रद्द केला जाऊन त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल, असे वरिष्ठ आरोग्य अधिकांऱ्यानी सांगितले.