दिल्लीत विजेच्या प्रश्नावरून हलकल्लोळ उडवून निवडणुकीत त्याचा लाभ घेतल्यानंतर ‘आप’ने गुरुवारी महाराष्ट्रातील विजेचा प्रश्न हाती घेत राज्यात तीन वर्षांत वीज क्षेत्रात २२ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. पण टीकेच्या भरात केलेल्या बेताल विधानांमुळे वीजक्षेत्रातील प्राथमिक गोष्टींचीही माहितीच ‘आप’कडे नसल्याचे स्पष्ट झाले आणि या आरोपांचे गांभीर्यच हरवले.
‘महानिर्मिती’ देशी कोळसा न उचलता कोळसा आयात करते व त्यात गेल्या तीन वर्षांत तीन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप ‘आप’च्या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया आणि सतीश जैन यांनी गुरुवारी केला. न उचललेला कोळसा खासगी बाजारपेठेत विकून त्यातून ५७०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला, दुय्यम दर्जाचा कोळसा व त्यामुळे कमी वीजनिर्मिती झाल्याने २९२६ कोटी रुपयांचा फटका बसल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्बन क्रेडिटचा विचार करता ३३६५ कोटी रुपयांचा फटका बसल्याचा आरोपही त्यांनी केला. गेल्या पाच वर्षांत नवीन वीजप्रकल्पांच्या उभारणीत दहा हजार कोटी रुपये खर्च केले. पण वीजनिर्मिती क्षमतेत वाढ झाली नाही. तसेच नऊ हजार कोटी रुपये दुरुस्ती व देखभालीवर खर्च झाले. त्याचाही उपयोग झाला नाही. या सर्वामधूनही भांडवली खर्चाच्या नावाखाली दहा हजार कोटींचा चुराडा झाला असा आरोप दमानिया व जैन यांनी केला.
महानिर्मितीची टीका
‘कोल इंडिया’कडून जेमतेम ७० टक्केच कोळसा पुरवला जातो. ‘महानिर्मिती’ कोळसा उचलत नाही हा ‘आप’चा दावा चुकीचा असल्याचे ‘महानिर्मिती’ने स्पष्ट केले आहे. तर राज्यातील काही शहरांमध्ये खासगी कंपन्यांना परवाना द्यावा या ‘आप’च्या मागणीवरून बाजारातून वीज घेण्याची वकिली करून ‘आप’ने त्यांचा खरा चेहरा उघड केल्याची टीका ‘महावितरण’ने केली आहे.