गोरेगाव आरे कॉलनीतील अथर्व शिंदे (२१) हत्या प्रकरणात पोलिसांनी बारा जणांना ताब्यात घेतले असून यात बर्थडे गर्लचाही समावेश आहे. अथर्वच्या हत्या प्रकरणात ज्या तरुण-तरुणींची चौकशी सुरु आहे ते सर्व सधन कुटुंबातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सात मे रोजी बर्थ डे पार्टीसाठी म्हणून घराबाहेर पडलेला अथर्व घरी परतलाच नाही. बेपत्ता असलेल्या अथर्वचा ९ मे रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास आरे कॉलनीतील रॉयल पम्प तळयाजवळ मृतदेह सापडला. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा होत्या.

अथर्वचे वडिल नरेंद्र शिंदे आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक आहेत. अथर्व सात मे च्या रात्री बर्थ डे पार्टीसाठी म्हणून घराबाहेर पडला होता. तो ज्या मुलीच्या बर्थ डे पार्टीला गेला होता तिचे वडिल मराठी चित्रपटांचे निर्माते आहेत. अथर्वची हत्या नेमकी कशी झाली त्याचा खुलासा अद्याप पोलिसांनी केलेला नाही पण पार्टीमध्ये मारामारी झाली. अथर्व बाहेरच्या दिशेने पळत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरे कॉलनीतल्या रॉयल पाल्मस येथील बंगला नंबर २१२ मध्ये ही पार्टी होती तिथे मद्य आणि ड्रग्सची रेलचेल होती. पार्टीच्या ठिकाणापासून अर्धा किलोमीटर अंतरावर अथर्वचा मृतदेह सापडला. रॉयल पाल्मस येथील बंगले पार्ट्यांसाठी भाडयावर दिले जातात. एक रात्रीसाठी ३० हजार रुपये भाडे आकारले जाते. सोमवारी रात्री बंगला नंबर २१२ मध्ये मोठया आवाजात म्युझिक सिस्टीम सुरु होती असे स्थानिकांनी सांगितले. पोलिसांनी या बंगल्याचा स्टाफ आणि कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. अथर्व आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. कांदिवली पूर्वेला ठाकूर व्हिलेज येथे तो राहायचा. पुण्यामधून त्याने साऊंड इंजिनियरचे शिक्षण घेतले होते.