अनेक वर्षे दुरवस्थेत असलेले आरे वसाहतीतील रुग्णालय अखेर मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित होत आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने याला मान्यता दिली असून पालिकेकडून या परिसरातील आदिवासी पाडे तसेच कर्मचारी वसाहतीला अधिक चांगल्या आरोग्य सेवा मिळण्याची शक्यता आहे.
आरेतील ११ एकर जागेवर हे आरोग्य केंद्र आहे. आरे वसाहतीमध्ये सुमारे २७ आदिवासी पाडे आहेत तसेच कर्मचारी वसाहतींसाठी हे केंद्र महत्त्वाचे आहे. या परिसरात या रुग्णालयाखेरीज आरोग्यसेवा नाही. दुरवस्था झालेल्या रुग्णालयातूनही स्थानिकांना कोणत्याही सेवा नीट मिळत नसल्याने हे रुग्णालय पालिकेकडे देण्याची मागणी गेली पाच वर्षे सुरू होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री रवींद्र वायकर यांनी याबाबत पाठपुरावा केला. मात्र पशू व दुग्ध विकास विभागाकडून कोणतीही पावले उचलली जात नव्हती. विधानसभेतही आरेतील आरोग्याच्या गंभीर समस्येबाबत चर्चा झाली होती. विधिमंडळाच्या अंदाज समितीने २०१२मध्ये आरेला भेट दिल्यानंतर हे रुग्णालय पालिकेकडे सोपवण्यात यावे, असे सुचवले होते त्यानंतर आरे रुग्णालयाची ११०० चौ. मीटर जागा, निवासी इमारतीची ११०० चौरस मीटर जागा मुंबई पालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता याबाबत १५ फेब्रुवारी रोजी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने शासन निर्णयही जाहीर केला आहे.