आंदोलक जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीला

मुंबई : आरेमधील मेट्रो ३ कारशेड आणि वृक्षतोडीस विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, त्यास दहा महिने उलटले तरी गुन्हे कायम असल्याने ते मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी आंदोलकांनी शुक्रवारी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली.

पुढील दहा दिवसांत गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे आश्वासन आव्हाड यांनी दिल्याचे आरे ‘कन्झव्‍‌र्हेशन ग्रुप’कडून सांगण्यात आले.

आरेमधील मेट्रो कारशेडच्या जागेवरील वृक्षतोडीचा निर्णय झाल्यावर ४ ऑक्टोबरच्या रात्रीच २,६४६ झाडे तोडण्यात आली. त्या वेळी रात्रभर मोठय़ा प्रमाणात या ठिकाणी आंदोलन झाले. यामध्ये २९ आंदोलकांना अटक झाली. त्यांना दोन दिवसांनी सशर्त जामीन मिळाला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर २९ नोव्हेंबरला कारशेडच्या कामास स्थगिती दिली, तर १ डिसेंबरला आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला, २ डिसेंबरला तसा शासन निर्णयदेखील काढण्यात आला.

या घडामोडीस दहा महिने झाल्यानंतरदेखील आंदोलकांवरील गुन्हे अद्यापही कायम असल्यामुळे आंदोलकांनी शुक्रवारी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. आव्हाड यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर पुढील दहा दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे, आरे कन्झव्‍‌र्हेशन ग्रुपच्या अम्रिता भट्टाचारजी यांनी सांगितले. ऑक्टोबरपूर्वी आरे आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणीही या वेळी भट्टाचारजी यांनी केली.

मागणी काय? : आम्ही जानेवारीपासून गृह राज्यमंत्री, पोलीस अधीक्षक आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांची भेट घेत आहोत. मात्र अद्यापही याबाबत कसलीच हालचाल झाली नसल्याचे आरे कन्झव्‍‌र्हेशन ग्रुपचे सदस्य रोहित जोशी यांनी सांगितले. आंदोलकांमधील अनेक जण तरुण विद्यार्थी असून त्यांच्यावर गुन्हे नोंद असल्याने त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.