सीआयडी चौकशीची गरज नाही
भंडारा जिल्ह्य़ातील तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि हत्याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर गेले पाच दिवस या मुद्दय़ावर चकार शब्दही न काढणारे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना शुक्रवारी जाग आली. शुक्रवारी त्यांनी भंडाऱ्यात जाऊन पीडित मुलींच्या आईचे सांत्वन केले. व्हीआयपी बंदोबस्ताचा ताण येऊ नये, यासाठी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी विनंती केल्याने आपण तेथे लगेच गेलो नसल्याचे स्पष्टीकरण पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले.
महिलांवरील अत्याचाराची माहिती मिळताच सात मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचतील, असा दावा करणाऱ्या गृहमंत्र्यांच्या हृदयापर्यंत या कुटुंबाची संवेदना पोहोचण्यास पाच दिवस लागले. तीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवायला गेलेल्या दुर्दैवी आईला सायंकाळपासून मध्यरात्री दीडपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. महिलांना रात्री पोलीस ठाण्यामध्ये बोलावू नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही ते पायदळी तुडविण्यात आले. जिल्हा अधीक्षक महिला असूनही त्यांनी तक्रारदारांना साधी भेटही दिली नाही.
एवढे सगळे होत असताना आर. आर. पाटील यांच्याकडून गृहमंत्री या नात्याने काहीच हालचाली दिसल्या नाहीत. गेल्या चार दिवसांत पुणे, कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी काहीही मतप्रदर्शन केले नाही किंवा भंडाऱ्याला धावही घेतली नाही.  शेवटी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत हा प्रकार गेल्यावर त्यांनी त्याच दिवशी रात्री उशिरा पोलीस निरीक्षकांना निलंबित केले व दुर्दैवी आईला मदत जाहीर केली. मात्र गृहमंत्री निष्क्रिय का राहिले, याची चर्चा सुरू झाली आहे.

ज्या पोलिसांनी तक्रार नोंदविण्यासाठी वेळ लावला आणि गेल्या चार-पाच दिवसांत काहीही छडा लावलेला नाही, हे पाहता या प्रकरणी राज्य गुन्हा अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे चौकशी सोपविण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र तपासासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली असून सीआयडीकडे तपास सोपविण्याची आवश्यकता नाही, असे पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. या घटनेनंतर मीही लगेच गेलो असतो, तर पोलिसांवरचा ताण वाढला असता, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मी लगेच गेलो नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी केले.