मालवणी परिसरात एक वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रकार पोलिसांनी चोवीस तासात उघडकीस आणला. याप्रकरणी ओदिशाच्या २४ वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. सफाला नायक (२४) असे तिचे नाव आहे.
सफाला मालवणी परिसरात एका अभिनेत्रीच्या घरी दोन वर्षे घरकाम करत होती. अभिनेत्रीच्या कपडे शिलाई निमित्ताने शिवणकाम करणाऱ्या अशोक राठोड यांच्याशी तिची ओळख झाली. अभिनेत्रीकडील काम बंद झाल्यावर ती मालवणीतच दुसऱ्या एका घरात काम आणि वास्तव्य करु लागली. दरम्यान ५ जानेवारीला तिचे काम सुटले आणि राहण्याची व्यवस्था नसल्याने तिने अशोक यांच्याकडे दोन दिवसांसाठी घरी राहू देण्याची विनंती केली. एक दिवसातच सफाला हिचा अशोक यांच्या मुलीला लळा लागला. त्यामुळे ६ जानेवारीला रात्री ८.३० च्या सुमारास तिने या मुलीला घेऊन पोबारा केला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदेव कालापाडा यांनी दिली. पोलिसांत तक्रार आल्यानंतर पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने आणि पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी यांनी तांत्रिक तपासाच्या सहाय्याने हिचा थांगपत्ता शोधून काढला. पोलिसांनी ठाणे येथील हिरानंदानी परिसरातून सफालाला ताब्यात घेऊन मुलीची सुखरुप सुटका केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 9, 2021 12:00 am