कडाक्याचे ऊन तर कधी कमालीची थंडी, मैलोन्मैल दूरवर चिटपाखरूचाही मागमूस नाही आणि वेगवान वाऱ्यांमुळे फडफडणाऱ्या शिडाच्या बोटीवरील एकटा शिलेदार.. अशा प्रतिकूल वातावरणात म्हादेई बोटीतून जगाची परिक्रमा करून परतलेल्या अभिलाष टॉमीचे तब्बल १५७ दिवसांनी पाय जमिनीला लागले. कोठेही न थांबता अविरत प्रवास करून परतलेल्या अभिलाषचा उत्साह मात्र उधाणलेलाच होता. ‘माझी ही सागरी परिक्रमा तरुणांना सागरी साहसाची प्रेरणा देईल’ असे सांगतानाच संधी मिळाल्यास पुन्हा एकदा जग ‘पादाक्रांत’ करण्याची इच्छाही त्याने बोलून दाखवली.
 गेट वे ऑफ इंडिया आणि आयएनएस म्हैसूर या दोहोंच्यामध्ये असणारी परिक्रमेची अंतिम रेषा पार केल्यानंतर अभिलाषने शनिवारी दुपारी सव्वातीन वाजता जमिनीवर पाऊल ठेवले. त्याआधी मुंबईजवळ समुद्रात त्याचे आगमन झाले तेव्हा दोन टग बोटीतून त्याच्यावर जलवर्षांव करण्यात आला, तर समुद्रावरील सर्व युद्धनौकांवरील सारे अधिकारी त्याला सलामी देत होते. यावेळी उपस्थित असलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हेलिकॉप्टरमधून त्याचे अभिनंदन केले.
तब्बल पाच महिन्यानंतर २२ हजार सागरी मैल अंतर कापल्यानंतरदेखील अभिलाषचा उत्साह मोहिमेच्या पहिल्या दिवसाइतकाच टवटवीत दिसत होता. ‘आज सागर परिक्रमा संपली नसून, देशातील नौकानयनाच्या क्षेत्रातील नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. माझ्या सागर परिक्रमेपासून देशातील तरुणांनी स्फूर्ती घेऊन आणखी सागरी साहसांना सामोरे जावे,’ अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. याप्रसंगी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अभिलाषच्या जग प्रदक्षिणेमुळे भारताचे नाव जगातील मोजक्याच देशांच्या यादीत नोंदवले आहे, असे गौरवोद्गार काढले.
अभिलाषने आपल्या यशाचे श्रेय निवृत्त व्हाईस अ‍ॅडमिरल मनोहर आवटी, कमांडर दिलीप दोंदे आणि बोटीचे शिल्पकार रत्नाकर दांडेकर यांना दिले. नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल डी. के. जोशी यांनी तिसऱ्या सागर परिक्रमेबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया देत, महिला अधिकारीदेखील अशी मोहीम करू शकेल अशी आशा व्यक्त केली.