पनामा पेपर्स प्रकरणापाठोपाठ पॅरेडाईज पेपर्स प्रकरणातही महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव गोवले गेले आहे. याचमुळे अमिताभ बच्चन यांच्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरूवात केली. पत्रकार आणि न्यूज अँकर अभिसार शर्मा यांनी अमिताभ बच्चन यांची खिल्ली उडवली. ट्विटरवर करण्यात आलेल्या या ट्विटवर मजेदार प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. अमिताभ बच्चन हे त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या पहिल्या सिझननंतर बर्मुडा येथील एका डिजिटल मीडिया कंपनीचे शेअरधारक झाले होते, अशी माहिती पॅरेडाईज पेपर्स प्रकरणात समोर आली.

विदेशात केलेल्या या गुंतवणुकीबाबत अमिताभ बच्चन यांनी आरबीआयला माहिती दिली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पनामा पेपर्स प्रकरणातही अमिताभ बच्चन यांचे नाव समोर आले होते. या प्रकरणात त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. आता पॅरेडाईज पेपर्स प्रकरणीही अमिताभ यांचे नाव पुढे आल्याने त्यांच्यावर टीका होते आहे.

पत्रकार अभिसार शर्मा यांनी अमिताभ बच्चन यांच्या दिवार सिनेमातला संवाद ट्विट करत टीका केली आहे. ‘आज मेरे पास बंगला है, प्रॉपर्टी है, पनामा है, पॅरेडाईज है..’ असे ट्विट करताच नेटकऱ्यांनी यावर बच्चन यांची फिरकी घेतली. अमिताभ बच्चन हे भाजपच्या जवळचे आहेत म्हणून त्यांच्यावर काहीही कारवाई होणार नाही. काही जणांनी अभिसार यांनी लिहिलेला अर्धवट संवाद पूर्ण केला आहे.

तर काही नेटकऱ्यांनी ‘मेरे पास मोदी डिटर्जेंट है जो हर दाग धो देता है’ असे म्हणत ट्विटरवर खिल्ली उडवली आहे. ‘तुम्हारे पास क्या है… जुमला?’ ‘और मैं सरकार चलाने वालोंकी गुड बुक्समें हूँ क्या कर लोगे तुम, भाई?’ मेरे पास हर सरकारी अॅडभी है (स्वच्छ भारतसे लेकर जीएसटीतक, पल्स पोलिओसे लेकर गुजरात टुरिझमतक) असे म्हणत अनेक नेटकऱ्यांनी अभिसार शर्मा यांचा अर्धवट ट्विट पूर्ण केला आहे.