अजित पवार यांची ग्वाही

पुणे : आषाढी वारीबाबत मानाच्या पालख्यांचे विश्वस्त, वारकरी यांच्या मागण्यांबाबत गेल्या वर्षी एवढे कडक नाही, पण थोडी मोकळीक देऊन मार्ग काढू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली.

वाहनातून वारी करण्याबाबत प्रमुख दहा मानाच्या पालख्यांच्या विश्वस्तांनी मान्यता दर्शवली आहे. मात्र, प्रस्थान सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढवावी, रिंगण सोहळा, पालख्यांच्या  सेवेकऱ्यांना पंढरपूरला जाण्यास परवानगी मिळावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘आषाढी वारीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन निर्णय झाला आहे. मात्र, इतरही काही मागण्या मानाच्या पालख्यांचे विश्वस्त आणि वारकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांच्या समितीशी विश्वस्त चर्चा करत आहेत. गेल्या वर्षी इतके कठोर नाही, मात्र थोडी मोकळीक देऊन मार्ग काढत आहोत.’  लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांनाच आषाढी वारीसाठी पंढपुरात प्रवेश देण्यात येणार असल्याचे पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले यांनी जाहीर के ले आहे. तसेच वारी ज्या गावातून जाणार आहे, तेथील  ग्रामस्थ व प्रशासनानेदेखील हीच भूमिका घेतली आहे.