सुमारे पाच हजार अधिकारी, अंमलदारांची लस घेण्यास टाळाटाळ

मुंबई : करोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकारी, अंमलदारांची शोधाशोध आयुक्तालयाने सुरू केली असून अशा पोलिसांची यादी लस न घेण्याच्या कारणासह सादर करण्याचे आदेश आयुक्तालयाने पोलीस उपायुक्तांना दिले आहेत.

करोना प्रतिबंधासाठी पहिल्या फळीतून धडपडणाऱ्या आरोग्य सेवकांसह पोलिसांचे लसीकरण फेब्रुवारी महिन्यात सुरू झाले. त्या प्रक्रियेस तीन महिने झाले तरी मुंबई पोलीस दलात लसीकरणाचा पहिला टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही. पोलीस प्रवक्ते चैतन्य एस. यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण मनुष्यबळापैकी ३६ हजार ९३ जणांनी (८७ टक्के) लशीची पहिली मात्रा घेतली. तर २६ हजार २७७ जणांनी (६४ टक्के) दुसरी मात्रा घेतली.

मुंबई पोलीस दलात सध्या उपलब्ध ४१ हजार मनुष्यबळ असून पाच हजार अधिकारी, अंमलदारांनी अद्याप पहिली मात्रा घेतलेली नाही, असे निदर्शनास येताच आयुक्तालयाने पोलीस ठाणी, गुन्हे शाखा, विशेष शाखा, सशस्त्र दलासह एकूण २२ विभागांत लस न घेणाऱ्या अधिकारी, अंमलदारांची यादी मागितली. या यादीत अधिकाऱ्याचे नाव आणि त्यापुढे लस न घेण्याचे कारण नमूद करावे, अशी सूचनाही केली. लोकसत्ताला मिळालेल्या माहितीनुसार उपायुक्तांनी आपापल्या आधिपत्याखालील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कक्षप्रमुखांकडून माहिती घेतली तेव्हा पहिली मात्रा न घेतलेल्यांपैकी बहुतांश अधिकारी, अंमलदारांनी टाळाटाळ केल्याचे निरीक्षण पुढे आले.

सर्वसामान्य नागरिकांना रांगेत उभे राहूनही लस मिळेल, याची शाश्वती नसताना पोलिसांसाठी लसीकरणाची संधी हुकवल्याबद्दल वरिष्ठ अधिकारी नाराज असून याप्रकरणी त्या त्या विभागांचे प्रमुख, कक्ष अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. तसेच टाळाटाळ करणाऱ्यांना ठरावीक दिवसांच्या आत लस घेण्याचे बंधनही घातले जाण्याची शक्यता असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, करोना संसर्गाचा धोका कमी करण्याच्या दृष्टिकोनातून लसीकरणाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्याची काही अंशी जबाबदारी पोलिसांवर देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पोलीस दलातूनच लसीकरणाबाबत उदासीनता असल्यास चुकीचा संदेश समाजात पसरू शकेल. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचेच समुपदेशन करण्याची पाळी पोलिसांवर येऊन ठेपल्याची प्रतिक्रिया या अधिकाऱ्याने लोकसत्ताकडे व्यक्त केली.

सुरुवातीला लसीकरणाचा प्रयोग पोलीस दलावर होणार, अशी अफवा पसरली होती. पहिल्या आणि दुसऱ्या लसीकरणाच्या दरम्यान करोनाचा धोका जास्त असतो, असाही गैरसमज पसरला. लस घेतल्यानंतर ताप, अशक्तपणा आदी त्रासाला घाबरून टाळाटाळ करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे समजते.