मालवणी विषारी दारूकांडातील किशोर पटेल या आणखी एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने सिल्वासा येथे अटक केली. पटेल मिथेनॉल हे रसायन आतिक खानला विकायचा. या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या नऊ झाली आहे.
मालाडच्या दारूकांडाने १०४ जणांचे बळी घेतले आहेत. गावठी दारू पिणाऱ्यांना पाण्यात मिथेनॉल मिसळून दिले जात होते. मन्सूर ऊर्फ आतिक खान हा आरोपी गुजरातमधून ते आणून फ्रान्सिस आल्मेडा आणि सलीम शेख यांना विकायचा. खानच्या अटकेनंतर किशोर पटेलचे नाव समोर आले. फरारी पटेलच्या शोधासाठी गुन्हे शाखेची पथके गुजरातमध्ये गेली होती. अखेर गुरुवारी रात्री त्याला  केंद्रशासित दादरा नगरहवेलीच्या राजधानी सिल्वासातून अटक झाली. त्याला ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
किशोर पटेल हा वापी येथील व्यापारी. तेथील अनेक कारखान्यांना अनेक पुरवठादार मिथेनॉल पुरवतात. पण ते दारुसाठी वापरले जाऊ नये म्हणून त्यात पाण्यात न विरघळणारे ब्युटेनॉल हे रसायन टाकले जाते. परंतु पटेल राज्य उत्पादन शुल्क कर्मचाऱ्यांना प्रतिलिटरमागे दहा रुपये लाच देऊन ब्युटेनॉल हे रसायन मिसळण्यापूूर्वीच मिथेनॉल बाहेर काढून विकत होता. ते पाण्यात टाकून दारू म्हणून विकले जाई. वापीमधून ते मुंबईत कसे येत होते, याचा आता तपास सुरू आहे.