ठोकळेबाजपणातून बाहेर पडून विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीने शिकविणाऱ्या दर्जेदार शिक्षकांचा अभाव हीच आजच्या परिस्थितीत गंभीर राष्ट्रीय आपत्ती म्हणायला हवी, अशा शब्दांत ज्येष्ठ संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शिक्षण, संशोधन क्षेत्रात भारताच्या होणाऱ्या पिछेहाटीचे मूळ नेमके कशात आहे याकडे लक्ष वेधले. राईट टू एज्युकेशन’चा (शिक्षण हक्क कायदा) गवगवा तर खूप झाला. पण, आता वेळ ‘राईट’ (योग्य) शिक्षणावर विचार करण्याची आली आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
संशोधन आणि अध्ययन क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी आठवडय़ाच्या प्रत्येक शनिवारी मुंबई विद्यापीठातर्फे मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या या ‘आईज’ नामक उपक्रमाची सुरूवात शनिवारपासून डॉ. माशेलकर यांच्या व्याख्यानाने झाली.
यावेळी ‘मेकिंग इम्पॉसिबल, पॉसिबल’ या विषयावर ते बोलत होते. आपले शिक्षण हे फारच परीक्षाकेंद्री आहे. शिक्षकांकडून प्रश्नही एका साच्यातले विचारले जातात आणि त्यांची उत्तरेही विद्यार्थ्यांनी एकाच साच्यात द्यावी अशी अपेक्षा ठेवली जाते. एका प्रश्नाला अनेक उत्तरे असू शकतात असा विचार कुणी का करत नाही. यामुळे मुलांमधील विचारांची लवचिकताच आपण मारून टाकतो असे ते म्हणाले सर्वसमावेशक आणि विज्ञानधिष्ठीत शिक्षण हेच आपले भवितव्य आहे. त्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही, असेही ते म्हणाले