दिल्ली पोलिसांकडून मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून अटक

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा पुतण्या अबू अस्लम कासीम आझमी (४३) याला मंगळवारी रात्री दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमधून अटक केली. दिल्ली पोलिसांनुसार अबू अस्लम आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर टोळीचा प्रमुख हस्तक आहे. पार्टी ड्रग म्हणून जगात प्रसिद्ध असलेल्या एमडीएमए किंवा आइस या अंमली पदार्थाचा साठा अबू अस्लमने मुंबईहून दिल्लीतील हस्तकांना धाडला होता. या साठय़ाची कुरिअर कंपनीमार्फत पॅरिस आणि अन्य देशांमध्ये तस्करी होणार होती. दिल्ली स्पेशल सेलचे उपायुक्त संजीव कुमार यादव यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार अबू अस्लमने धाडलेल्या साठय़ाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ४० कोटींहून अधिक आहे.

दिल्ली पोलिसांनी अबू अस्लमकडे केलेल्या चौकशीतून या अंमली पदार्थाची निर्मिती महाराष्ट्रात होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आइसचा वापर रेव्ह पार्टीत केला जातो. अंमली पदार्थविरोधी यंत्रणांच्या अभ्यासानुसार या अंमली पदार्थाची निर्मिती व नशा युरोप, अमेरिकेत सर्वाधिक होते. तसेच हा अंमली पदार्थ परेदशातून भारतात चोरटय़ा मार्गाने आणला जातो. त्यामुळे अबू अस्लमने महाराष्ट्रात निर्मितीबाबत दिलेली माहिती गंभीर असल्याचे मानले जाते.

आइस या अंमली पदार्थाच्या तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा म्होरक्या कैलाश राजपूत असून त्याला दोनेक वर्षांपूर्वी केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथक, हवाई गुप्तचर विभागाकडून मुंबईत अटक झाली होती. आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया अशी कैलाशची ओळख आहे. दुबईत कार्गो कंपनीत काम करता करता अबू अस्लमची कैलाशसोबत ओळख झाली. झटपट श्रीमंत होण्यासाठी तो कैलाशच्या अंमली पदार्थ तस्कर टोळीत सक्रिय झाला. मुंबईत अटक घडल्यानंतर निर्दोष सुटण्यासाठी कैलाशला अबू अस्लमने सर्वतोपरी मदत केली होती. त्यामुळेच तो कैलाशचा विश्वासू हस्तक बनला. उपायुक्त यादव यांच्या माहितीनुसार, अबू अस्लम मुंबईत राहून कैलाशच्या इशाऱ्यावरून आइस या अंमली पदार्थाची तस्करी देशभर आणि देशाबाहेर करत होता. दिल्ली, मुंबई, चंदिगड अशा प्रमुख शहरांमध्ये अबू अस्लमने आपले जाळे विणले होते. त्याचप्रमाणे या दोघांनी गोव्यात हॉटेल व्यवसायही सुरू केला होता. त्या माध्यमातून त्यांनी गोव्यातही अंमली पदार्थाची मोठय़ा प्रमाणात विक्री केली.

या कारवाईत अबू अस्लमकडून अंमली पदार्थ किंवा अन्य वस्तू सापडल्या नाहीत. मात्र आमच्याकडे त्याच्याविरोधात भक्कम पुरावे आहेत. हॉटेलमध्ये त्याच्यासोबत एक महिलाही होती. तिचा या तपासाशी संबंध नाही, अशी माहिती दिल्ली स्पेशल सेलचे उपायुक्त यादव यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. दरम्यान, दिल्ली स्पेशल सेलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासात भविष्यात राज्यात आणखी छापे पडू शकतात.

  • दिल्ली स्पेशल सेलचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून या टोळीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.
  • ४ जूनला उपायुक्त यादव आणि सेलमधील अन्य अधिकाऱ्यांना दिल्लीमध्ये दाखल झालेला आइसचा मोठा साठा महिपालपूर येथील प्रीफर लॉजिस्टिक या कुरिअर कंपनीच्या माध्यमातून अमेरिका आणि युरोपात धाडला जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कुरिअर कंपनीवर पाळत ठेवली. ठरल्याप्रमाणे कुरिअर कंपनीचा कर्मचारी अवधेश कुमार पहाटे पाचच्या सुमारास पाच किलो आइसचा साठा घेऊन धडकला. पथकाने त्याला अटक केली.
  • दोन वर्षांपूर्वी कंपनीत रुजू झालेल्या अवधेशने हे काम कंपनीचा व्यवस्थापक चंदन राय आणि मालक अमितकुमार अग्रवाल यांच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली. या दोघांनाही तात्काळ अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून अबू अस्लमचे नाव समोर आले. अबू अस्लम मुंबईत असल्याची माहिती मिळताच दिल्ली स्पेशल सेलच्या ८ अधिकाऱ्यांचे पथक इथे धडकले.
  • वाकोला पोलिसांच्या मदतीने मंगळवारी रात्री या पथकाने ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये धाड घालून अबू अस्लमला अटक केली आणि त्याला दिल्लीला नेले.