कसाबचा खटला संपल्याने भारतातील कायद्यानुसार तो अबू जुंदाल किंवा अन्य आरोपींवर खटला चालविण्यास पूर्णपणे निरुपयोगी होता. पाकिस्तानातील खटल्यामध्येही त्याचा फारसा उपयोग होणार नसल्याचे मत वरिष्ठ पातळीवरील आढाव्यात व्यक्त करण्यात आल्याने फाशी देऊन कसाबला संपविण्याचा निर्णय घेण्यात आला. कसाबसह अन्य अतिरेक्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण आणि विशेषत: भाषा शिकविणाऱ्या अबू जुंदालला काही काळापूर्वी भारतात आणण्यात आले आहे. त्याने नरिमन हाऊस येथे अतिरेकी हल्ला सुरू असताना दूरध्वनीवर अतिरेक्यांशी केलेल्या संभाषणाची ध्वनिफीत उपलब्ध आहे. जुंदालविरूध्द खटला चालविण्यासाठी कसाबच्या कबुलीजबाबाचा कोणताही उपयोग भारतातील कायदेशीर तरतुदींसाठी नाही. टाडा कायदा अस्तित्वात असता, तर उपयोग होऊ शकला असता. जुंदालचा सहभाग सिद्ध करून त्याला शिक्षा होण्यासाठी फारसे पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्याला अन्य ठिकाणच्या विविध खटल्यात सहभाग दाखवून पोलिस कोठडी मिळविण्यात येत आहे. मात्र अतिरेकी हल्ल्यातील गुन्हा सिद्ध करणे अवघड असल्याचे सूत्रांनी सांगितले.
झकी उर रेहमानसह काही आरोपींवर पाकिस्तानातील न्यायालयातही खटला चालू आहे. आपल्या व अमेरिकेच्या राजनैतिक दडपणामुळे पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. तेथेही कसाबच्या कबुलीजबाबाचा कितपत उपयोग होईल, याविषयी कायदेतज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केली. आपल्या अधिकाऱ्यांना व दंडाधिकाऱ्यांना कसाबचा कबुलीजबाब नोंदविण्याची  आणि त्याची चौकशी करू देण्याची मागणी पाकिस्तानने केली होती. पण ती भारताने अमान्य केली होती. हा खटला चालविण्याची पाकिस्तानची फारशी इच्छाच नाही. या आरोपींना भारताच्या ताब्यात देण्यास पाकिस्ताननेही नकार दिला आहे. कसाबला फाशी झाल्याने ते निमित्त करून पुराव्याअभावी झकी उर रेहमानसह अन्य आरोपींची सुटका केली जाण्याची शक्यता आहे.