मुंबई उच्च न्यायालयाची ‘एटीएस’ आणि तुरुंग प्रशासनाला नोटीस
आर्थर रोड कारागृहातील ‘अंडासेल’मध्ये कसाबचे भूत आपल्या मानगुटीवर बसते. तिथे मला ठेवू नका, असे साकडे लष्कए-तैय्यबाचा संशयित दहशतवादी अबू जुंदाल याने आता उच्च न्यायालयाला घातले आहे. त्यावर न्यायालयाने गुरुवारी राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) आणि आर्थर रोड तुरुंग अधिकाऱ्यांना आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले.
न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने हे आदेश देत याचिकेवरील सुनावणी पुढील आठवडय़ात ठेवली. विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने याबाबतची विनंती फेटाळून लावल्यावर जुंदालने आता उच्च न्यायालयाचे दार ठोठावले असून त्याच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. कसाबला फाशी दिल्यानंतर त्याच्या ‘अंडासेल’मध्ये अबू जिंदालला ठेवण्यात आले. परंतु या ‘अंडासेल’मध्ये ठेवल्यापासून कसाबचे भूत आपल्याला त्रास देत असल्याचा दावा करीत तेथून आपल्याला दुसरीकडे हलविण्याची विनंती जुंदालने आधी ‘मोक्का’ न्यायालयाकडे केली होती. मात्र त्याची मानसिक स्थिती स्थिर असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्यानंतर न्यायालयाने त्याची विनंती फेटाळली गेली. त्यानंतरही विविध क्लृप्त्या करून जुंदालने कसाबच्या ‘अंडासेल’मधून हलविण्याची मागणी न्यायालयाकडे केली. त्यावर न्यायालयाने त्याला फटकारत त्याला असे फुटकळ अर्ज न करण्यास बजावले होते. त्यामुळे जुंदालने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणीही न्यायालयाची नोटीस
२००८ सालच्या मालेगाव स्फोटाप्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी याने केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने ‘एटीएस’, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त तसेच गृहसचिवांना नोटीस बजावली आहे. आपला या बॉम्बस्फोटात सहभाग नसल्याचा दावा करीत आपल्याला ‘एटीएस’ने बेकायदा अटक केल्याचा आरोप चतुर्वेदीने याचिकेत केला आहे. आपल्यावर स्फोटासाठीचे आरडीएक्स बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी आपला अजिबात संबंध नसल्याचा दावा चतुर्वेदी याने केला आहे.