विकासक प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड अबू सालेम याला मुंबईच्या विशेष ‘टाडा’ न्यायालयाने सोमवारी दोषी धरले. अहंकार दुखावला गेल्यानेच सालेमने ही हत्या घडवून आणल्याचे न्यायालयाने त्याला दोषी ठरविताना नमूद केले आहे.
न्यायालयाने सालेमला जैन यांची हत्या, हत्येचा प्रयत्न या आरोपांसह दहशतवादी प्रतिबंधक कायद्याअंतर्गतही दोषी धरले असून त्याला नेमकी काय शिक्षा द्यायची याचा निर्णय मंगळवारी होण्याची शक्यता आहे. सालेमला १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यासह विविध खटल्यांत अटक करण्यात आली असली तरी तरी पहिल्यांदाच त्याला एखाद्या खटल्यात दोषी ठरविण्यात आले आहे. सालेमसह याप्रकरणी त्याचा माजी चालक मेहंदी हसन आणि ८६ वर्षांचा बिल्डर व्ही. के. जांब या दोघांनाही न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
७ मार्च १९९५ रोजी जैन यांच्या त्यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर गोळीबार करण्यात आला होता. या वेळी जैन यांचा भाऊ मात्र बचावला होता. सालेमने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनिस याच्या साथीने दुबईमध्ये बसून जैन यांच्या हत्येचा कट रचला. त्यांच्या धमक्यांना जैन बंधूंनी प्रतिसाद न दिल्याने जैन यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे सबळ पुरव्यांच्या आधारे सरकारी पक्षाने सिद्ध केल्याचे स्पष्ट करत ‘टाडा’ न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप यांनी सालेम आणि अन्य दोघांना दोषी ठरवले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2015 12:15 pm