लग्नासाठी पॅरोल किंवा तात्पुरता जामीन मिळावा, यासाठी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य दोषींपैकी एक असणाऱ्या अबू सालेम याने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अबू सालेमने आपल्या याचिकेत उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या दोन निकालांचा दाखला दिला आहे. हे निकाल सुनावताना न्यायालयाने तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या दोषींना लग्न करण्यासाठी तात्पुरत्या कालावधीची सुट्टी दिली होती. त्याचाच आधार घेत आता अबू सालेमने आपली याचिका न्यायालयापुढे मांडली आहे.

२०१५ मध्ये एका महिलेने न्यायालयात अबू सालेमला आपल्याशी विवाह करायला लावावा, अशी मागणी केली होती. सालेमने तिच्या या मागणीला होकार दिला होता. त्यानंतर हे प्रकरण पुढे सरकले नव्हते. मध्यंतरीच्या काळात विशेष टाडा न्यायालयाकडून अबू सालेम आणि अन्य पाच जणांना मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर सध्या न्यायालयात या दोषींना शिक्षा सुनावण्यापूर्वीचा युक्तिवाद सुरू आहे. मात्र, सालेमने आता अचानकपणे लग्नासाठी पॅरोल देण्याची मागणी केली आहे. यासाठी आम्ही याचिकापत्रात मुंबई आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या दोन निकालांचा हवाला दिल्याची माहिती अबू सालेमच्या वकील फरहाना शहा यांनी दिली.

या याचिकेत सालेमने त्याला विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह करू देण्याची परवानगी मागितली आहे. पूर्वीच्या दोन निकालांप्रमाणे सालेमलाही लग्नासाठी सूट मिळावी, अशी मागणी शहा यांनी कोर्टापुढे केली. त्यानंतर न्यायमूर्ती जी.ए. सानप यांनी सीबीआयला या याचिकेवर स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले.

अबू सालेमचा फक्त आवाज ऐकूनच प्रेमात पडली होती मोनिका

२०१५ साली एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, सालेमला लखनऊ न्यायालयात सुनावणीसाठी नेले जात असताना त्याने फोनवरून एका महिलेशी निकाह केला होता. तेव्हा न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करायला सांगितले होते. मात्र, चौकशीदरम्यान पोलिसांनी तिचे सालेमशी संबंध आहेत किंवा नाही, हे तपासण्यासाठी अनेकांना सालेम आणि तिचे छायाचित्र दाखवले होते. मात्र, त्यामुळे आपली बदनामी झाली. तेव्हापासून कोणीही आपल्याशी लग्न करायला तयार नाही. त्यामुळे अबू सालेमनेच आपल्याशी विवाह करावा, अशी मागणी या महिलेने केली होती. त्यावर सालेमने नाचक्कीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी संबंधित महिलेशी विवाह करायला होकार दिला होता.

बोहल्यावर चढण्यास अबू सालेम तयार..!