बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन हत्याप्रकरणी विशेष ‘टाडा’ न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला कुख्यात गुंड अबू सालेम याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पोर्तुगालशी केलेल्या हस्तांतरण करारानुसार आपल्याला जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकत नाही, असा दावा सालेमने केला आहे.
गेल्या महिन्यात ‘टाडा’ न्यायालयाने सालेमसह त्याचा चालक मेहंदी हसन आणि बांधकाम व्यावसायिक जांब यांना प्रदीप जैन हत्या प्रकरणात दोषी ठरवले होते. तसेच सालेम व हसनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
‘टाडा’ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाऐवजी थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याची तरतूद आहे. त्यामुळे सालेमने थेट सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे, अशी माहिती त्याच्या वकील सबा कुरेशी यांनी दिली. भारतीय कायद्याच्या चौकटीत राहूनच सालेमला त्याने केलेल्या गुन्ह्य़ासाठी शिक्षा सुनावण्यात आली असून शिक्षेची अंमलबजावणी करायची की ती कमी करायची हा भारत सरकारचा अधिकार आहे, असे ‘टाडा’ न्यायालयाचे न्या. जी. ए.  सानप यांनी  नमूद केले होते.