13 August 2020

News Flash

‘आधीच्या सरकारकडून पोलीस दलाचा गैरवापर’

भीमा कोरेगाव व एल्गार परिषदेचा तपास ‘एनआयए’कडे सोपविण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

शरद पवार

भिडे, एकबोटेंनी वातावरण बिघडवल्याचा आरोप

मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार व एल्गार परिषद या दोन्ही प्रकरणांत पोलीस दलाचा गैरवापर झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी तत्कालीन फडणवीस सरकारवर केला. या प्रकरणांचा तपास करणाऱ्या पोलिसांचीच चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली. भीमा कोरेगाव व एल्गार परिषदेचा तपास ‘एनआयए’कडे सोपविण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पवार पुढे म्हणाले की, भीमा- कोरेगाव आणि एल्गारचा संबंध नव्हता. भीमा-कोरेगाव हा वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षे एका ठिकाणी लोक विजयस्तंभाला अभिवादन  करण्यासाठी जमतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही भीमा -कोरेगावला जाऊन स्तंभाला भेट दिली होती. त्या काळात जे युद्ध झाले, त्यात पेशव्यांचा पराभव झाला होता. ब्रिटिशांच्या बाजूने काही घटक होते, हे यावरून स्पष्ट होते. इथले स्थानिक ग्रामस्थ येथे येणाऱ्या लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करत होते. त्यावेळी कोणतीही कटुता नव्हती. मात्र आजूबाजूच्या खेडय़ात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी फिरून वेगळे वातावरण निर्माण केल्याचा आरोप पवार यांनी केला.  पुरोगामी विचाराच्या लोकांनी एल्गार परिषद घेतली होती. न्या. पी. बी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद होणार होती, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आले नाहीत. त्या परिषदेत भाषणे झाली. पोलीस अहवाल सादर केला गेला, त्यात सगळी माहिती दिली. त्या परिषदेशी ज्यांचा संबंध नाही व त्या ठिकाणी जे हजर नव्हते, त्यांच्यावर खटले भरण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

एल्गार परिषद झाल्यावर शपथ घेण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामधाम पुणे यांनी त्याचा अहवाल दिला आहे. जी शपथ घेण्यात आली, त्यात संविधानाचा उल्लेख आहे, असे असताना त्यांना तुरुंगात डांबले आहे. जे परिषदेला उपस्थित नव्हते त्यांनाही डांबले आहे. सत्तेचा कसा गैरवापर केला हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे हे प्रकरण मला लोकांच्या समोर आणायचे आहे, असे त्यांनी सांगितले. पोलिसांतील हेर कोण? भीमा-कोरेगाव प्रकरणाचा नव्याने आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची बैठक झाली. त्यानंतर लगेचच केंद्र सरकारने हे प्रकरण ‘एनआयए’कडे सोपविण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारला त्या बैठकीची माहिती कुणी पुरविली, त्यात कोणत्या अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, त्याची माहिती चौकशीत पुढे येईल, असे शरद पवार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 1:29 am

Web Title: abuse of police force by previous government bhima koregoan hincachar elgar council akp 94
Next Stories
1 उच्च न्यायालयाच्या आदेशाचीच बनावट प्रत
2 शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगाचे लाभ लांबणीवर?
3 मुंबईतही ‘चेंज ऑफ गार्ड’
Just Now!
X