कोकण मार्गावरील रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेकडून वातानुकूलित डबल डेकर रेल्वे २०१५ मध्ये सुरू करण्यात आली. मात्र रेल्वेचे देखभाल-दुरुस्तीकडे असलेले दुर्लक्ष, मुंबईतून गाडीची सुटण्याची योग्य नसलेली वेळ यासह अन्य कारणांमुळे प्रवाशांनी डबल डेकरकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली. यामुळे डबल डेकर बंद करण्याचाही विचार मध्य रेल्वेकडून सुरू होता; परंतु अनेक स्तरांतून त्याला विरोध झाल्याने बंद करण्याचा विचार मागे पडला. यानंतर रेल्वेने आता तिकीट आरक्षणातच बदल केला आहे. चार महिने आधी आरक्षण करता येणे शक्य असतानाच या गाडीसाठी एक महिन्याचे आरक्षण उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाइन आरक्षण करताना डबल डेकरसाठी नवीन वर्षांच्या फेब्रुवारी ते एप्रिलर्पयचे तिकीटही उपलब्ध होताना दिसत नाही. फक्त जानेवारी महिन्याचे तिकीट उपलब्ध होत आहे. हे पाहता यामागे गाडी बंद करण्याचा ‘छुपा’ प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

२०१५ मध्ये कोकण मार्गावर पहिली वातानुकूलित लोकल गाडी सुरू करण्यात आली होती. आठ डब्यांची असलेली लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते करमाळीपर्यंत धावणारी ट्रेन मडगावपर्यंत चालवण्यात येऊ लागली. आठवडय़ातून तीन दिवस धावणारी डबल डेकर ट्रेन प्रथम गणेशोत्सवात प्रीमियम म्हणून चालवण्यात आल्याने भाडे अवाच्या सवा वाढले आणि कोकण मार्गावरील प्रवाशांच्या खिशाला कात्रीच लागली. त्यानंतर दिवाळीत नियमितपणे गाडी सुरू करतानाच प्रीमियम पद्धत हटवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत गेला; परंतु मुंबईतून गाडीची सुटण्याची वेळ, या गाडीच्या देखभाल-दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष आणि त्यामुळे प्रवाशांच्या वाढत जाणाऱ्या तक्रारींमुळे गर्दीच्या काळाशिवाय अन्य दिवसांत गाडीला प्रवासी मिळणेही कठीण झाले.

वातानुकूलित डबल डेकर सकाळी ५.३३ वाजता एलटीटीतून सुटते. मुळातच दादर, लालबाग, परळ आणि वांद्रे ते बोरिवलीपर्यंत मोठय़ा प्रमाणात कोकणचा प्रवासी राहात असल्याने एलटीटी स्थानकात डबल डेकर गाडी पकडण्यासाठी बरीच कसरतही करावी लागते.

तिकीट आरक्षणात बदल

वातानुकूलित डबल डेकर गाडी आठवडय़ातील बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारीच धावते. या गाडीला फक्त ४० टक्क्य़ांहून कमी प्रवासी उपलब्ध होत आहेत. डबल डेकरच्या तिकीट आरक्षणात बदल केल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. तरीही सध्या रेल्वे प्रशासनाकडून गाडी बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. महत्त्वाची बाब म्हणजे या बदलाची रेल्वेतील बऱ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना साधी माहितीही नाही. अनेक अधिकाऱ्यांकडून त्याची वेगवेगळी कारणे दिली जात होती.