गणपतीसाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांना गेल्या वर्षी वातानुकूलित डबलडेकर गाडीची भेट देणाऱ्या रेल्वेने यंदा ही गाडी कोकण मार्गावर न चालवण्याची तयारी केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या देखभाल-दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेच्या कार्यशाळेत असलेली ही गाडी तेथून दक्षिण भारतात किंवा मध्य प्रदेशात जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रीमियम दरांत गाडी चालवणे, दिवाळीच्या वेळी ती साधारण दरांत चालवणे अशा रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ धोरणाचा फटका या गाडीला बसला आहे. रेल्वे प्रशासन मात्र या सर्वाचे खापर प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादावर फोडत आहे.
गणेशोत्सवाआध कोकण रेल्वेमार्गावरर मालगाडी घसरल्याने या गाडीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यानंतर रेल्वेने ही गाडी दिवाळीच्या काळात विशेष गाडी म्हणून चालवली. या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अत्यल्प असते. त्यामुळे मध्य रेल्वेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर मध्य रेल्वे ही गाडी ख्रिसमसच्या सुटीत गोव्यापर्यंत चालवेल, अशी अटकळ होती. मात्र रेल्वेने या गाडीऐवजी शताब्दी एक्सप्रेस चालवत नफा कमावला. ही गाडी देखभाल दुरुस्तीसाठी गेल्याचे कारण मध्य रेल्वेने दिले होते, तसेच कोकणासाठी या गाडीला अत्यल्प प्रतिसाद असल्याने ही गाडी कोकण मार्गावर यशस्वी होणार नाही, अशी भूमिका मध्य रेल्वेतील काही अधिकारी घेत आहेत. ही गाडी दक्षिण भारतात किंवा मध्य प्रदेशात चालवण्याचे आदेश रेल्वे बोर्डातून येत्या आठवडाभरात येणे अपेक्षित असल्याचे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मध्य रेल्वेने नेहमीच्या दरांत ही वातानुकूलित गाडी कोकण रेल्वेमार्गावर चालवून पाहणे आवश्यक आहे, असे कोकण रेल्वे प्रवासी एकता महासंघाचे अध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले. ही गाडी दुसरीकडे वळविणे अन्यायकारक असल्याचे ते म्हणाले.