कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी गेल्या गणपतीत मोठा गाजावाजा करत सुरू केलेली वातानुकूलित डबलडेकर गाडी रेल्वेने त्यानंतर लगेचच मागे घेतली. ही गाडी दिवाळी, ख्रिसमस आदी सणांच्या वेळी मागणी असूनही कोकण रेल्वेमार्गावर चालवण्यात आलेली नाही. आता ही गाडी देखभाल दुरुस्तीसाठी रेल्वेच्या कार्यशाळेत असून ती होळीच्या सुमारास कोकणात जाण्याची शक्यता धूसर आहे. ही गाडी दुरुस्तीनंतर कोकण सोडून इतर मार्गावर चालवण्याचा घाट रेल्वेत घाटला जात आहे. मात्र ही गाडी नियमित करण्यात यावी, अशी मागणी  होत आहे.
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या नोकरदारांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने वातानुकूलित डबलडेकर गाडी सुरू केली खरी, पण ती गाडी रेल्वेने प्रीमियम दरांत चालवली. त्यामुळे या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद थंडाच होता. त्यानंतर कोकणातील गर्दीचा मोसम सरल्यावर ही गाडी रेल्वेने पुन्हा एकदा कोकणासाठी म्हणून नेहमीच्या दरात चालवली. मात्र त्या वेळीही अल्प प्रतिसादच मिळाला. त्यानंतर ही गाडी प्रवाशांच्या नजरेसही पडलेली नाही.
ही गाडी सध्या दर १८ महिन्यांनी होणाऱ्या देखभाल दुरुस्तीसाठी रेल्वेच्या कार्यशाळेत आहे.  दुरुस्तीनंतर ही गाडी कोकणात धावणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. खुद्द रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्येही याबाबत साशंकता आहे. काही अधिकाऱ्यांच्या मते ही गाडी दक्षिणेकडील एखाद्या मार्गावर चालवण्यासाठी दक्षिण रेल्वेकडे रवाना होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळातही ही गाडी सर्वसामान्य दरांत चालवली असती, तर  प्रतिसाद दिला असता. मात्र रेल्वेने त्या वेळी गरजू प्रवाशांकडून दामदुप्पट दर वसूल करण्यासाठी ती गाडी प्रीमियम दरांत चालवली. आता पुन्हा एकदा होळीच्या वेळी ही गाडी साधारण दरांत चालवण्याची मागणी प्रवासी करत आहेत.