कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने सुरू केलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव वातानुकूलित डबलडेकर गाडीला पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या नियोजनशून्यतेचाच फटका बसला आहे. या गाडीच्या वेळेदरम्यान दोन तासांच्या अंतरात कोकणात जाणाऱ्या तीन गाडय़ा याआधीच उपलब्ध आहेत. तसेच पहाटेच्या अडनिडय़ा वेळी लोकमान्य टिळक टर्मिनससारख्या अडनिडय़ा ठिकाणाहून ही गाडी सुटत असल्याने गेल्या १४ फेऱ्यांत फक्त आठच वेळा ही गाडी ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरली. उर्वरित दिवशी या गाडीला सरासरी ३० टक्केही प्रतिसाद मिळालेला नाही.
मडगावला जाणारी वातानुकूलित डबलडेकर गाडी काही तांत्रिक अडचणींमुळे कुल्र्यापल्याड येऊ शकत नसल्याचे मध्य रेल्वेने आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून सोडण्यात येत आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून पहाटे साडेपाच वाजता निघते. गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना पाचच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणे क्रमप्राप्त आहे. मात्र ईस्थर अनुह्य़ा प्रकरणाआधीपासूनच हा परिसर असुरक्षित समजला जात असल्याने बहुतांश प्रवासी या टर्मिनसच्या वाटय़ाला जात नाहीत.
तसेच ही गाडी पहाटे साडेपाचला सुटते. या गाडीच्या पाच मिनिटे आधी दादरहून मडगावकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस निघते. केवळ पाच मिनिटे आधी निघणारी जनशताब्दी दुपारी अडीच वाजता मडगावला पोहोचते. तर वातानुकूलित डबलडेकर गाडी संध्याकाळी साडेपाच वाजता मडगावला पोहोचते. परिणामी प्रवासी दादरहून सुटणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला प्राधान्य देतात. त्याशिवाय पहाटे सहाच्या सुमारास दिवा-सावंतवाडी आणि सात वाजता सीएसटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस या दोन गाडय़ांचा पर्यायही प्रवाशांकडे आहे. त्यामुळे रेल्वेने वातानुकूलित डबलडेकर गाडीचे टर्मिनस अथवा वेळ बदलावी, अशी मागणी प्रवाशांकडून पुढे येत आहे.
मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते ही गाडी जनशताब्दी एक्स्प्रेसला पर्याय म्हणून चालवण्याची गरज आहे. त्यासाठी ती दादरहून सोडण्याची गरज आहे. मात्र टिळक पुलाच्या कमी उंचीमुळे ही गाडी दादपर्यंत येणे शक्य नाही. तसेच या गाडीचे तिकीट दर कमी केले, तरी गाडीला उत्तम प्रतिसाद मिळेल.

गाडी तोटय़ातच
लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव या अंतरासाठी एका फेरीला साडेपाच लाख रुपये खर्च येतो. डबलडेकर गाडीतील सर्व आसने भरल्यास रेल्वेला आठ लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र १४ दिवसांत फक्त सात वेळाच या गाडीने पाच लाखांच्यावर उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे ही गाडी तोटय़ात असल्याचे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात येत आहे.