प्रवाशांना गारेगार प्रवासाचा अनुभव देणारी पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकल शुक्रवारी सकाळी अंधेरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी रोखून धरली होती. चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या एसी लोकलच्या काही डब्ब्यांमधील वातानुकूलित यंत्रणा व्यवस्थित काम करत नसल्यामुळे प्रवाशांनी साखळी खेचून लोकल रोखून धरली होती. विरार-चर्चगेट लोकलमधील एसी व्यवस्थित चालत नसल्यामुळे काही प्रवाशांना घुसमटल्यासारखे होऊ लागले तसेच शरीरातून घामच्या धारही वाहत होत्या त्यामुळे प्रवाशांनी लोकल रोखून ही बाब रेल्वेच्या निदर्शनास आणून दिली.

लोकल ट्रेनने बोरीवली स्टेशन सोडल्यापासून कुलिंग व्यवस्थित होत नव्हते. सुरुवातीला आम्हाला वाटले कि, थोडयावेळात सर्व काही सुरळीत होईल पण काही स्टेशन गेल्यानंतरही एसी व्यवस्थित काम करत नव्हता असे एका प्रवाशाने सांगितले. दरवाजे बंद असल्यामुळे खेळती हवा आत येऊ शकत नव्हती. त्यामुळे घुसमटल्यासारखे होऊन घाम येत होता त्यामुळे आम्ही साखळी खेचून ट्रेन थांबवण्याचा निर्णय घेतला असे एका प्रवाशाने सांगितले.

तांत्रिक बिघाडामुळे एसीमध्ये काही समस्या आहेत जो पर्यंत दुरुस्ती होत नाही तो पर्यंत एसी लोकल धावणार नाही असे पश्चिम रेल्वेने नंतर टि्वट करुन सांगितले. एसी लोकलच्या तीन डब्ब्यांच्या एसीमध्ये बिघाड झाला आहे. तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर लगेच सेवा सुरु होईल. बिघाड दुरुस्त झाला नाही तर दिवसभरासाठी एसी लोकल बंद राहील असे पश्चिम रेल्वेचे प्रवक्ते रविंद्र भाकर यांनी सांगितले.

वातानुकूलित लोकलचे भाडेदर डिसेंबरपर्यंत ‘जैसे थे’च
पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे मंत्रालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. वातानुकूलित लोकलचे भाडेदर पुढील सहा महिन्यांपर्यंत ‘जैसे थे’च ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. २४ डिसेंबर २०१८ पर्यंत भाडेदरात वाढ करण्यात येणार नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

२५ डिसेंबर २०१७ रोजी पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल गाडी धावली. सध्या पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते बोरिवली, विरारदरम्यान या लोकल गाडीच्या दिवसाला बारा फेऱ्या होत आहेत. पहिले सहा महिने सध्याच्या प्रथम श्रेणीच्या बेस फेअरच्या १.२ पट भाडे आकारण्यात येत आहे.