दादर स्थानकात स्वयंचलित दरवाजे उघडलेच नाही, प्रवाशाची ट्विटरवर माहिती

मुंबई : पश्चिम रेल्वेवर सोमवारी दादर स्थानकात आलेल्या या लोकलच्या डब्यांचे स्वयंचलित दरवाजे उघडलेच नाहीत. त्यामुळे गाडीत काही प्रवाशांना प्रवेश करता आला नाही. या संदर्भात एका प्रवाशाने ट्विटरवर याची माहिती देऊन प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे परत करणार का, असा सवालही केला. मात्र अशी कोणतीही मोठी घटना घडली नसून काही सेकंदासाठी एका डब्याचे दरवाजे उघडले नव्हते. गाडी पुढे रवाना होऊन त्याच्या दिवसभर फेऱ्याही झाल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

चर्चगेट ते विरारदरम्यान वातानुकूलित लोकल गाडीच्या बारा फेऱ्या होतात. सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात एकच लोकल असून शनिवार आणि रविवार देखभाल-दुरुस्तीसाठी या लोकलची सेवा बंद ठेवली जाते. गेल्या काही दिवसांपासून या लोकलमध्ये तांत्रिक समस्या येत आहेत. स्वयंचलित दरवाजा न उघडणे किंवा वेळेत बंद न होणे, वातानुकूलित यंत्रणा योग्य पद्धतीने न चालणे अशा तांत्रिक समस्या येत असल्याने प्रवाशांकडूनही त्याविरोधात पश्चिम रेल्वेकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत मध्यंतरी रिसर्च डिझाइन स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन, चेन्नईतील रेल्वेच्या आयसीएफसह अन्य अधिकाऱ्यांनी यात काही बदल सुचविले.

त्याप्रमाणे केलेल्या बदलानंतही या गाडीत तांत्रिक समस्या निर्माण होत आहे. सोमवारी सकाळी ९ वाजून १० मिनिटांच्या सुमारास चर्चगेटहून विरारला जाणारी वातानुकूलित लोकल दादर स्थानकात आली. त्या वेळी दादर स्थानकात असलेल्या प्रवाशांनी लोकलच्या डब्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता या गाडीचे स्वयंचलित दरवाजे उघडलेच नाहीत.याविरोधात माल्कम कपाडिया या प्रवाशाने ट्विटरवर माहिती दिली आणि प्रवाशांचे तिकीट वाया गेले असून त्यामुळे प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे परत करणार का, असा सवाल उपस्थित केला.

या संदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी या वातानुकूतिल लोकल गाडीच्या एकाच डब्याचा दरवाजा काही सेकंदासाठी उघडला नसल्याची घटना दादर स्थानकात घडली. यात प्रवाशांचे तिकीट वाया गेल्याचे माहीत नसल्याचेही त्यांनी सांगितले.