५९६४ प्रवासी क्षमता असताना प्रतिसाद कमी

सर्वसामान्य प्रवाशांच्या लोकल फेऱ्या रद्द करून पश्चिम रेल्वेवर दोन वर्षांपासून चालविल्या जाणाऱ्या आणि तब्बल सहा हजार इतकी आसनक्षमता असलेल्या वातानुकूलित लोकलमधून प्रति फेरी केवळ दीड हजार प्रवासीच प्रवास करत आहेत. या गाडीच्या दिवसभरात १२ फेऱ्या होतात. मात्र प्रति फेरी सरासरी दीड हजारच प्रवासी प्रवास करत असल्याने प्रवासी व उत्पन्न या उद्दिष्टापासून वातानुकूलित लोकल सेवा दूरच असल्याचे स्पष्ट होत आहे.

२५ डिसेंबर २०१७ ला पश्चिम रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल बोरिवली ते चर्चगेट धावली. या लोकल गाडीला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. सध्या एका वातानुकूलित लोकलच्या दिवसभरात १२ फेऱ्या होत असून चर्चगेट ते विरारदरम्यान आठ आणि चर्चगेट ते बोरिवलीदरम्यान तीन जलद लोकल फेऱ्या होतात. तर एक लोकल फेरी महालक्ष्मी ते बोरिवलीसाठी धीमी चालवण्यात येते. लोकलसाठी सामान्य लोकलच्या बारा फेऱ्या रद्द करून त्याऐवजी वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात आल्या. त्यामुळे सामान्य प्रवाशांनी त्याला विरोध केला होता. मात्र या विरोधानंतरही वातानुकूलित लोकल चालवण्यात आली. गेल्या दोन वर्षांत ९५ लाख ८१ हजार प्रवाशांनी वातानुकूलित लोकलमधून प्रवास केला असून त्यातून ४० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. मात्र या लोकलची ५२ कोटी रुपये किंमत आणि त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी लागणाराही खर्च पाहता उत्पन्न उद्दिष्टापासून दूरच आहे.

दररोज होणाऱ्या बारा फेऱ्यांमधून सरासरी १८ हजार प्रवासी प्रवास करतात. म्हणजेच प्रत्येक फेरीतून दररोज दीड हजार प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. वातानुकूलित लोकल गाडीची एकूण प्रवासी क्षमता ५ हजार ९६४ आहे. यात १ हजार २८ प्रवासी आसनक्षमता व ४ हजार ९३६ प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतील. मात्र मिळत असलेला प्रतिसाद पाहता तो कमीच आहे. सध्या दिवसभरात होणाऱ्या १२ फेऱ्यांमध्ये केवळ तीन फेऱ्यांनाच प्रतिसाद मिळत असून उर्वरित लोकल फेऱ्यांना फारसा प्रतिसाद नाही.