दोन महिने मध्य रेल्वेवर, पुढे महिनाभर पश्चिम रेल्वेवर तपासणी

मुंबईकरांच्या लोकल प्रवासाचा शिणवटा दूर करण्यासाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेल्या वातानुकूलित लोकलची रुळांवरील चाचणी अखेर सुरू झाली आहे. गुरुवारी रात्री ठाणे-टिटवाळा या भागात या गाडीची पहिलीवहिली चाचणी मध्यरात्री घेण्यात आली. आता पुढील दोन महिने मध्य रेल्वेवर विविध भागांमध्ये या चाचण्या होणार असून त्यात विविध गोष्टींची तपासणी होणार आहे. त्यानंतरचा महिनाभर ही गाडी पश्चिम रेल्वेवर चाचणीसाठी धावणार आहे. त्यामुळे ही गाडी सेवेत येण्यासाठी जुल किंवा ऑगस्ट महिना उजाडणार आहे.

चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीतून मुंबईत गेल्या वर्षी ५ एप्रिल रोजी दाखल झालेली वातानुकूलित लोकल साधारण ११ महिने कुर्ला कारशेडमध्येच बंदिस्त होती. सुरुवातीला या गाडीचा इन्सुलेटर हा भाग बदलायचा असल्याने ही गाडी कोणत्याही चाचणीविना पडून होती. त्यानंतर बेल्जियमवरून आलेल्या अधिकाऱ्यांनी व आरडीएसओच्या अधिकाऱ्यांनी या गाडीच्या कारशेडमधील चाचण्या घेतल्या. या चाचण्यांनंतरही प्रत्यक्ष रेल्वेमार्गावर गाडी चालवून घेण्याच्या चाचण्यांना मुहूर्त सापडत नव्हता.

अखेर ही गाडी गुरुवार-शुक्रवारच्या मध्यरात्री कुर्ला कारशेडमधून बाहेर पडली आणि ठाणे येथे आली. आरडीएसओ आणि मध्य रेल्वेचे अधिकारी यांच्या साथीने ही गाडी ठाणे ते कल्याण, कल्याण ते टिटवाळा, टिटवाळा ते कल्याण आणि कल्याण ते ठाणे अशी चालवण्यात आली. या दरम्यान गाडीची विद्युत प्रणाली, ब्रेकिंग प्रणाली, वातानुकूलन व्यवस्था, दरवाजे उघडबंद होण्याची प्रणाली आदींच्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांसाठी अजून १२ ते १४ वेळा ही गाडी चालवण्यात येणार आहे. शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री पुन्हा एकदा ही गाडी याच भागात चालवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मध्य रेल्वेवर या गाडीच्या चाचण्या झाल्यानंतर एका महिन्यासाठी पश्चिम रेल्वेमार्गावरही ही गाडी चालवून बघितली जाईल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त या गाडीची पाहणी करतील. आयुक्तांना सारे काही आलबेल आढळले, तरच या गाडीला सुरक्षा प्रमाणपत्र मिळून ही गाडी मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे.